प्रणवदांनी वडिलांप्रमाणे काळजी घेतली-मोदी

प्रणव मुखर्जी यांच्यावर आधारित ‘प्रेसिडेंट प्रणव मुखर्जी अ स्टेट्समन’, या फोटोंच्या पुस्तकांचं प्रकाशन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं.

Sonali Deshpande
03 जुलै: राजकीय विचारसरणीने आखलेल्या रेषा ओलांडत राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी एका वडिलांप्रमाणे माझी काळजी घेतली असं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झालेले दिसले. प्रणव मुखर्जी यांच्यावर आधारित ‘प्रेसिडेंट प्रणव मुखर्जी अ स्टेट्समन’, या फोटोंच्या पुस्तकांचं प्रकाशन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं की, 'गेल्या तीन वर्षात जेव्हा कधी आम्ही भेटलो तेव्हा त्यांनी मला एका मुलाप्रमाणेच वागवलं.''प्रणवदा मला नेहमी आराम घेण्याचा सल्ला देत असत. ते नेहमी माझी काळजी करत असत. तुम्ही एवढी धावपळ कशासाठी करता. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून काही कार्यक्रम कमी करा. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, ' असा सल्ला नेहमी त्यांच्याकडून मिळत असे असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या कौतुकाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनीही त्यांचे आभार मानले. त्यांनी सांगितलं की, 'राजकीय विचारधारा वेगळी असली तरी याचा राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या संबंधावर परिणाम पडत नाही.'राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. 17 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडणार आहे. यावेळी कोण पुढील राष्ट्रपती होणार यावर शिक्कामोर्तब होईल.

Trending Now