राजकारणात (Politics) एकमेकांचे प्रतिस्पर्धी (Rivals) असणारे नेते एकमेकांचे नातेवाईक (Relatives) असल्याची अनेक उदाहरणं आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया (Jyotiradiya Sindhiya) यांनी 2020 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या दोन्ही आत्या म्हणजेच वसुंधरा राजे सिंदिया आणि यशोधरा राजे सिंदिया या दोघीही पहिल्यापासूनच भाजपमध्ये आहेत. ज्योतिरादित्य सिंदिया, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि कुंडाचे आमदार राजा भैया हे एकमेकांचे नातेवाईक आहेत, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जाणून घेऊया, या शाही नात्यांविषयी.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया हे आता पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे नातलग झाले आहेत. ज्योतिरादित्य यांची बहीण चित्रांगदा यांची मुलगी मृगांकाचं लग्न अमरिंदर सिंग यांचे नातू निर्वाण सिंग यांच्याशी झालं आहे. या लग्नामुळे दोन्ही कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ झाले आहेत.
ज्योतिरादित्य आणि त्यांची पुतणी यांची एकमेकांसोबत खास गट्टी आहे. अनेक गोष्टी ते दोघं एकमेकांशी शेअर करत असतात. ज्योतिरादित्य यांच्या पत्नी प्रियदर्शनी या बडोद्याच्या गायकवाड मराठा घराण्यातील आहेत. 12 डिसेंबर 1994 या दिवशी त्यांचं लग्न झालं होतं. महाआर्यमन सिंदिया आणि अनन्या राजे सिंदिया ही त्यांची दोन मुलं.
हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांची कन्या अपराजिताचं लग्न राजघराण्यातील अंगद सिंहसोबत झालं आहे. अंगद सिंह हे पटियाला राजघराण्याचे वारसदार आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या बहिणेचे पुत्र. या मार्गानेदेखील वीरभद्र सिंह आणि अमरिंदर सिंह एकमेकांचे नातवाईक आहेत.
यापूर्वी काँग्रेसमधील दिग्गजांमध्येही नातेसंबंध निर्माण झाले होते. ज्योतिरादित्य सिंदिया यांची मोठी बहीण चित्रांगदा सिंदिया यांचं लग्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कर्ण सिंह यांचे चिरंजीव विक्रमादित्य यांच्यासोबत झालं होतं.