पुलवामा, 22 ऑगस्ट : सुरक्षेच्या दृष्टीनं देशात सध्या हाय अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात संशयास्पद बोट आणि शस्त्रास्त्र जप्त केली. त्यापाठोपाठ पंजाबमध्ये देखील मोठी कारवाई करण्यात आली. आता पुलवामा परिसरात देखील सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली आहे. दहशतवाद्यांच्या मनसुब्यांना पुन्हा एकदा सुरुंग लावला. पुलवामामध्ये घातपाताचा कट उधळला आहे. सुरक्षा दलाने रविवारी पुलवामामध्ये इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिव्हाइसला नष्ट करता करता मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. यामुळे मोठा दहशतवादी हल्ला घडू शकला असता. मात्र सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचे मनसुबे आधीच हाणून पाडले. जवानांनी त्राल जिल्ह्यातील बेहगुंड भागात 10 ते 12 किलो वजनाचे आयईडी जप्त केले. याला नष्ट करण्यात जवानांना आणि पोलिसांना यश आलं आहे. याआधी जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात बुधवारी एका मोकळ्या शेतातून सुमारे 44 किलो वजनाचा मोर्टार शेल जप्त करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने स्वच्छता मोहिमेदरम्यान ते दिसले. त्यानंतर जवानांच्या बॉम्बशोधक पथकाला पाचारण करून ते निकामी करण्यात आले. देशात वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं सध्या हाय अलर्ट देण्यात आला आहे. पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळली होती. यामध्ये शस्त्रास्त्र देखील आहेत. त्यामुळे कोकणहून मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या मार्गांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरघोड्या सतत सुरू असतात. सुरक्षा दलाने पुन्हा एकदा हे मनसुबे उधळून लावले. नाहीतर पुलवामा भागात मोठा अनर्थ घडला असता. माहिती मिळताच पोलीस आणि जवान यांनी घटनास्थळी दाखल होत आयईडी नष्ट केले.