नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : भारत-सीमा तणाव सध्या सुरू आहे. भारत सरकारनेही लडाखमधील चीनशी लागून असलेल्या सीमाभागात तयारी करून ठेवली आहे. अशाच पूर्व लडाख आणि चीनशी जोडलेल्या सीमाभागातील टेहाळणी यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी लवकरच भारतीय लष्करात इस्रायल आणि अमेरिकेतील ड्रोन विमानं दाखल होणार आहेत. इस्रायलचं हेरॉन आणि अमेरिकेची मिनी ड्रोन विमानं लवकरच भारतात दाखल होतील. सरकारी सूत्रांनी याबद्दल एएनआयला सांगितलं, ‘हेरॉन टेहाळणी ड्रोन विमान खरेदी कराराची बोलणी शेवटच्या टप्प्यात असून त्यावर डिसेंबर 20 मध्ये स्वाक्षरी होऊ शकते. सध्या भारतीय लष्कराकडे असलेल्या ड्रोनपेक्षा अतिशय आधुनिक असलेली हेरॉन ड्रोन लडाख सेक्टरमध्ये तैनात केली जाणार आहेत. ’ हे ही वाचा- महाराष्ट्राने आणखी एक वीरपूत्र गमावला; चाळीसगावातील 21 वर्षीय यश देशमुख शहीद सध्या चीनसोबत असलेल्या तणावाच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर लष्कराला आपली युद्धक्षमता बळकट करण्यासाठी कोणतीही शस्र किंवा यंत्रणा खरेदी करण्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दिला आहे. आणिबाणीच्या काळात लष्कराला आर्थिक निधी देण्याच्या पंतप्रधानांच्या विशेष अधिकारांच्या माध्यमातून हा निधी देण्यात आला असून, त्यातूनच ही ड्रोन विमान खरेदी केली जाईल. सीमा भागात विशिष्ट भागात तैनात असलेल्या लष्कराच्या तुकडीला त्या परिसरातील हालचालींची माहिती घेण्यासाठी अमेरिकेकडून मागवण्यात येणारी मिनी ड्रोन देण्यात येणार आहेत. ही ड्रोन सैनिक ऑपरेट करून त्या परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवतील, असंही सूत्रांनी सांगितलं. भारतीय लष्कराने 2019 मध्ये पाकिस्तानातील बालाकोटमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला होता त्यावेळी सरकारने लष्कराला असा शस्र खरेदीसाठी निधी दिला होता. याच निधीचा वापर करून भारतीय नौदलाने अमेरिकेतील जनरल ऑटॉमिक्स या फर्मकडून दोन प्रिडेटर ड्रोन विकत घेतली होती. भारतीय वायुसेनेनेही हाच निधी वापरून हवेतून जमिनीवर 70 किलोमीटर दूरच्या लक्ष्याचा भेद करणारी हॅमरही क्षेपणास्र विकत घेतली होती.