नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये (Hathras Gangrape Case) एका 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला, गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. 4 नराधमांनी बलात्कार केल्यानंतर तरुणीची जीभ कापली, पाठीचा कणा तोडला जेणेकरून मदतीसाठी तिला कुठे जाता येणार नाही. 14 दिवसांच्या लढाईनंतर मंगळवारी पीडित तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे उत्तर प्रदेशच्या कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हाथरस प्रकरणात यूपी पोलिसांवर अनेक आरोप केले जात आहे. रात्री उशिरा पीडितेचा मृतदेह तिच्या गावी पोहोचला. मात्र यावेळी पोलिसांनी कुटुंबियांशिवाय जबरदस्तीने पीडितेवर अंतिम संस्कार केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी मृतदेह घरी नेण्याची परवानगीही दिली नसल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. पीडितेच्या अंत्यसंस्काराचे अनेक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केले गेले आहेत, यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन सदस्यीय SIT गठित केली आहे. SIT आपले रिपोर्च 7 दिवसांत प्रस्तूत करतील असे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीनं सांगण्यात आले आहे.
‘शव जास्त काळ ठेवू शकत नाही’ सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओंपैकी एकात पोलीस अधिकारी पीडितेच्या कुटूंबाला असा सल्लाही देत आहेत की, “जास्त काळ मृतदेह ठेवणे योग्य नाही. प्रत्येक गोष्ट प्रथेनुसार असावी”. एका व्हिडीओमध्ये पीडित तरुणीची आई पोलिसांनी विनवण्या करताना दिसत आहेत. यात त्या, “माझ्या मुलीला एकदा घरी घेऊन जाऊ दे. अंत्यसंस्कार करण्याची एवढी घाई का? आता रात्र झाली आहे…घाई कशाला करत आहात? याला उत्तर देताना पोलीस अधिकारी म्हणाले की, ‘मी राजस्थानचा आहे. प्रथेनुसार मृतदेह जास्त काळ ठेवला जात नाही”. पोलिसांनी केलेल्या या अरेरावीनंतर सोशल मीडियावर रोष व्यक्त केला जात आहे. ‘मान्य करा तुमच्याकडून चूक झाली’ दुसर्या एका व्हिडीओमध्ये पीडितेची आई पुन्हा एकादा पोलिसांना विनवण्या करताना दिसत आहे. यात एक पोलीस अधिकारी, “प्रथा या काळानुसार बदलत जातात. तुम्ही मान्य करा की चुक तुमच्याकडूनही झाली आहे”. आणखी एक व्हिडीओमध्ये पीडितेची आई, “आम्हाला आमच्या मुलीला अखेरचा निरोप द्यायचा आहे. आम्हाला तिला हळद लावायची आहे, तेव्हा तिला निरोप देऊ. तुम्ही आम्हाला का नाही तिला घरी जाऊ देत आहात? का जबरदस्ती करत आहात?” सुमारे 200 पोलिसांनी रात्री अडीच्या सुमारास पीडितेवर अंत्यसंस्कार केलेय अंत्यसंस्काराच्या वेळी पोलीस कर्मचाऱ्यांना घेराव घालण्यात आला. मात्र पीडितेच्या कुटुंबियांना यावेळी दूर ठेवण्यात आले.
या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करत, त्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे.