. काँग्रेसमध्ये बदल घडवून आणण्यासाठी शशी थरूर यांनी स्वत:ला उमेदवार म्हणून सादर करून निवडणूक रंजक बनवली आहे.
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी सोमवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेतली. या भेटीमध्ये थरूर यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली. काँग्रेस अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी अनेक उमेदवार उभं राहणं पक्षासाठी चांगलं आहे, या प्रक्रियेत आपली भूमिका तटस्थ असेल, असं सोनिया गांधी यांनी शशी थरूर यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाकडून या निवडणुकीत कोणी अधिकृत उमेदवार नसेल, असंही सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान पक्षाचा सदस्य निवडणूक लढवण्यासाठी स्वतंत्र आहे. निवडणूक लढण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही, असं पक्ष नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. लोकसभा खासदार असलेल्या शशी थरूर यांनी काहीच दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचे संकेत दिले होते, यानंतर त्यांनी सोनिया गांधींची भेट घेतली आहे. थरूर सोनिया गांधींचं निवासस्थान असलेल्या 10 जनपथवर गेले आणि त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. सोनिया गांधींच्या भेटीनंतर थरूर लवकरच निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करू शकतात. शशी थरूर यांनी सोमवारी एक ऑनलाईन याचिकेला पाठिंबा दिला, ज्यात पक्षाच्या युवा सदस्यांनी सुधारणांची. तसंच नव्या अध्यक्षाने उदयपूर नवसंकल्प पूर्णपणे लागू करावा, अशी मागणी केली. या याचिकेवर 650 पेक्षा जास्त जणांनी हस्ताक्षर केलं आहे, अशी माहिती थरूर यांनी ट्वीट करून दिली. मे महिन्यामध्ये काँग्रेसचं उदयपूरमध्ये शिबीर झालं. या शिबिरामध्ये अनेक सुधारणा सुचवण्यात आल्या. यामध्ये एक व्यक्ती एक पद, एक कुटुंब एक तिकीट हे प्रमुख निर्णय होते. काँग्रेस निवडणुकीची प्रक्रिया काँग्रेस अध्यक्षपदासाठीची अधिसूचना 22 सप्टेंबरला जारी करण्यात येईल, यानंतर 24 ते 30 सप्टेंबरदरम्यान नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया असेल. नामांकन मागे घेण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि याचे निकाल 19 ऑक्टोबरला घोषित केले जातील.