जींद, 23 एप्रिल: हरियाणाच्या जींद येथील शासकीय रुग्णालयात एक अजब चोरीची घटना घडली आहे. बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास चोरट्याने कोरोना लशीच्या (Corona vaccine theft) जवळपास शंभर डोसची चोरी केली. मात्र, गुरुवारी या चोराने येथील सिव्हील लाईन पोलीस ठाण्याबाहेर चोरलेली सर्व औषधे एका चहा विक्रेत्याकडे दिली आणि ते सर्व डोस पोलिसांना देण्यास सांगितले. विशेष म्हणजे त्यामध्ये एक चिठ्ठीही सापडली, ज्यामध्ये त्याने - ‘Sorry मला माहीत नव्हतं यात कोरोनाचं औषध आहे’, असे लिहिले होते. बुधवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास शासकीय रुग्णालयातून कोरोना लसीचे अनेक डोस चोरी झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त जितेंद्र खटकर यांनी दिली. परंतु, गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास चोर सिव्हील लाईन पोलीस ठाण्याबाहेर असलेल्या चहाच्या दुकानाच्या वयोवृद्ध मालकाकडे गेला आणि त्याच्याकडे एक पिशवी दिली. त्याने त्या चहावाल्याला सांगितले की, हे एका पोलिसाचे जेवण आहे. बॅग ताब्यात देवून चोर लगेच तेथून गायब झाला. नंतर तो दुकानदार ती बॅग घेऊन पोलीस ठाण्यात गेला. तेथे उपस्थित पोलिसांनी बॅग उघडली तेव्हा त्यात कोविशिल्डचे 182 आणि कोवाक्सिनच्या 440 डोस दिसून आले. त्यासह लिहिलेली एक चिठ्ठीही मिळाली, ज्यामध्ये असे लिहिले होते, Sorry मला माहीत नव्हतं यात कोरोनाचं औषध आहे (हे वाचा - ‘भाजपचे किती नेते मला भेटले याची माहिती घ्या’, आरोपांना उत्तर देताना अजित पवारांचा गौप्यस्फोट ) कोणाला तरी रेमडेसिवीर इंजेक्शन (Remdesivir Injection) चोरायचे असावे, मात्र चोरट्याने चुकून कोरोना लस चोरी केली असावी, असा अंदाज या चोरीनंतर बांधण्यात येत आहे. मात्र, अद्यापपर्यंत चोरट्याविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही. यासंदर्भात पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात आयपीसी कलम 457 आणि 380 अन्वये गुन्हा दाखल केला आहे, असे पोलीस अधिकारी खटकर यांनी सांगितले. तर सध्या पोलीस या चोरट्याला पकडण्यासाठी काही सुगावा सापडतोय का, याची तपासणी करत आहेत. चोरलेली ही कोरोना लस जवळपास 12 तासाहून अधिक वेळ शीतगृहाच्या बाहेर राहिली होती. त्यामुळे तिचा उपयोग करायचा की, नाही असा प्रश्न आता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पडला आहे. याबाबत सिव्हिल सर्जन यांनी मुख्यालयाकडे मार्गदर्शक सूचना मागविली आहे. (हे वाचा - Coronavirus : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विस्फोटानं देश चिंतेत, अचानक का बिघडली परिस्थिती? ) दरम्यान, दवाखान्यात चोरी झाल्याचे पहिल्यांदा साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. सफाई कर्मचारी सुरेश कुमारला औषधालयातील कपाटे उघडी पडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे चोराने औषधे चोरली मात्र तथेच कपाटात असलेल्या रोख 50 हजारांना मात्र त्याने हात लावला नव्हता किंवा त्याला ते दिसले नसावेत. याबाबत रुग्णालयाकडून प्रधान वैद्यकीय अधिकारी डॉ. बिमला राठी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.