rahul gandhi
गांधीनगर, 8 डिसेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. दोन टप्प्यांमध्ये झालेल्या गुजरात विधानसभेच्या मतदानानंतर एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळेल असं दिसत आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाकडूनही अनेकांनी अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, तसंच या निवडणुकीत काँग्रेसचं काय होणार? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे. गुजरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राहुल गांधी भारत जोडो यात्रेमध्ये होते. शेवटच्या काळात राहुल गांधी त्यांची भारत जोडो यात्रा स्थगित करून गुजरात निवडणुकीच्या प्रचाराला आले. गुजरातमध्ये आतापर्यंत लागोपाठ 6 वेळा भाजपची सत्ता आली आहे. आता एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले तर लागोपाठ सातव्यांदा गुजरातमध्ये भाजपचं कमळ फुलेल. 2017 साली काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली होती. भाजपला 100 च्या आत रोखण्यात काँग्रेसला यश आलं होतं. 2017 च्या निकालामध्ये भाजपला 99 आणि काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने गुजरातमध्ये 1962, 1967 आणि 1972 मध्ये पहिल्या तीन विधानसभा निवडणुका जिंकल्या. 1975 मध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर लढलेल्या निवडणुकांमध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील पक्षांच्या आघाडीने, काँग्रेसचे बंडखोर नेते चिमणभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील जनसंघ आणि किसान मजदूर पक्षाचा पराभव केला. त्यानंतर 1980 आणि 1985 च्या निवडणुका काँग्रेसने जिंकल्या. 1990 च्या निवडणुकीत जनता दल आणि भाजप एक मजबूत शक्ती म्हणून उदयास आले. 1995 नंतर झालेल्या सर्व निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत.