मुंबई, 12 सप्टेंबर : महाराष्ट्रात भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी करण्यात आलेला महाविकास आघाडीचा (MVA) प्रयोग उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोव्यातही (Goa) करण्याचे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले आहेत. महाराष्ट्रात जर तीन पक्ष एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेऊ शकतात, तर इतर राज्यातही हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो, असं राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यात शिवसेना निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची घोषणा राऊत यांनी केली आहे. अशी असेल रणनिती गोव्यात शिवसेना गेल्या 5 वर्षांपासून सातत्यानं काम करत असून आगामी विधानसभा निवडणुकीत 20 ते 21 जागा लढणार असल्याचं राऊतांनी सांगितलं आहे. जर आघाडीत आम्हाला स्थान मिळालं, तर आघाडीसोबत निवडणुका लढू, अऩ्यथा आम्ही स्वबळावर आमचे उमेदवार उभे करू असं राऊत म्हणाले. तर उत्तर प्रदेशातही शिवसेना 80 ते 100 जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा राऊतांनी केली आहे. उत्तर प्रदेशात काही शेतकरी संघटना आमच्यासोबत यायला तयार असून त्यांच्यासोबत निवडणूक लढवायला शिवसेना तयार असल्याचं ते म्हणाले. हवेत गोळीबार नको भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मविआतील मंत्र्याबाबत केलेल्या विधानावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कानाखाली आवाज काढला तरी आम्ही सत्ता सोडणार नाही, असं राज्य सरकारमधील एक मंत्री खासगीत म्हणाल्याचं विधान पाटील यांनी केली होतं. त्यावर एक मंत्री म्हणजे नेमका कोण मंत्री हे पाटील यांनी सांगावं, उगीच हवेत गोळीबार करू नये, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे. हे वाचा - गुजरातमध्ये भाजप कमजोर झाल्याची टीका
एखाद्या पक्षानं मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेणं, ही त्या पक्षाची अंतर्गत बाब असून त्यावर भाष्य करण्याची गरज नसल्याचं राऊत यांनी सांगितलं. मात्र त्याच वेळी गुजरातमध्ये भाजपची स्थिती बिकट झाली असून गेल्या वेळी कसंबसं काठावर बहुमत मिळाल्याचं ते म्हणाले. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, तसाच तो भाजपलाही असल्याचा टोला त्यांनी लगावला.