नवी दिल्ली, 23 जून: देशात कोरोनाची (COVID-19) दुसरी लाट आटोक्यात येत असताना दुसरं संकट उभं ठाकलं आहे. आता देशात कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस (Delta Plus Variant) व्हेरिएंटनं थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. या व्हेरिएंटमुळे देशात तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. देशात आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे 40 हून अधिक (Around 40 cases) रुग्ण सापडलेत. दिवसेंदिवस या व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. धक्कादायक म्हणजेच यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र राज्यातील आहेत. त्यामुळे राज्याच्या आरोग्य प्रशासनाकडून मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या (Union Health Ministry) म्हणण्यानुसार, डेल्टा प्लस व्हेरिएंटला कसे सामोरे जावे यासंबंधी माहिती देण्यासाठी राज्यांना पत्र लिहिण्यात आलं आहे. भारतीय एसएआरएस-सीओव्ही -२ जीनोमिक कन्सोर्टियाच्या नुकत्याच झालेल्या निष्कर्षांच्या आधारे महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश यांना मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्हेरिएंटवर काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हेही वाचा- परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मुंबईतल्या दोन कॉल सेंटरवर छापा केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश (Maharashtra, Kerala and Madhya Pradesh) या राज्यात सर्वाधिक डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आलेत. आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक 21, मध्य प्रदेश 6, केरळ 3, रुग्ण आढळून आलेत. याव्यतिरिक्त तामिळनाडूमध्ये 3 तर पंजाब, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर या राज्यांत प्रत्येकी एक रुग्ण सापडलेत. केंद्र सरकारनं केरळ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं योग्य आरोग्यविषयक उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट अर्थात उत्परिवर्तन अवस्थेत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलं आहे. कोरोना व्हायरसचं डबल म्युटेशन सर्वात आधी महाराष्ट्र राज्यात आढळून आलं होतं. सर्वात आधी भारतात आढळून आलेल्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये बदल होऊन डेल्टा प्लस व्हेरिएंट तयार झाल्याचं तज्ज्ञांचा अंदाज आहे.