नवी दिल्ली, 20 एप्रिल: जहांगीरपुरीतील (Jahangirpuri) हिंसाचारानंतर एमसीडीकडून बेकायदा बांधकामांवर (illegal constructions) बुलडोझर (bulldozers) चालवण्याची कारवाई सुरू झाली. मात्र, काही वेळानंतर न्यायालयाने स्थगितीचा आदेश दिला. या आदेशानंतरही बुलडोझरची कारवाई थांबली नव्हती,परिसरातील दुकानांपासून घरांपर्यंत बुलडोझर धावताना दिसले. या कारवाईचे व्हिडिओ सध्या समोर आले आहेत. मशिदीजवळ बांधलेल्या दुकानावरही हा बुलडोझर आदेशानंतर कारवाई करताना दिसला. जहांगीरपुरीतील बेकायदा बांधकाम पाडण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देऊनही बुलडोझर कारवाई करताना दिसला. सुप्रीम कोर्टाचा आदेश येण्यापूर्वीच बुलडोझर जामा मशिदीवर पोहोचले. मशिदीचे गेट आणि प्लॅटफॉर्म पाडण्यात आले आहेत. मंदिराबाहेर बुलडोझरही तैनात आहे. याठिकाणी सध्या असलेली बेकायदा बांधकामे पाडण्याचीही तयारी सुरू आहे. लोकांनी येथे विरोध सुरू केला आहे. एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
या जामा मशिदीजवळ हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर हल्ला करण्यात आला. मशिदीबाहेरील एका मोबाईलच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली. याशिवाय मशिदीबाहेर बांधलेले प्लॅटफॉर्म आणि गेटही पाडण्यात आले. यावेळी मशिदीत उपस्थित काही लोकांनी विरोध केला.
मशिदीबाहेरचे अतिक्रमण पाडण्यात आले, तर काही अंतरावर असलेल्या मंदिराबाहेरील अतिक्रमणही पाडण्यात आले. यादरम्यान काही लोकांनी निदर्शनेही केली. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले. गुरुवारी पुन्हा सुनावणी आता या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. यापूर्वी जमियत-उलेमा-ए-हिंदने देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या बुलडोझर कारवाईविरोधातील आपल्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. दुष्यंत दवे यांनी हे प्रकरण प्रथम सर्वोच्च न्यायालयात मांडले. बेकायदेशीर कारवाई केली जात असून नोटीसही देण्यात आलेली नाही, असे ते म्हणाले. यानंतर, सीजेआय म्हणाले की, सध्याची स्थिती कायम ठेवली पाहिजे.