नवी दिल्ली : आयकर विभाग देशात अनेक ठिकाणी एकाच वेळी अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. राजधानी दिल्लीपासून अनेक राज्यांमध्ये एकाचवेळी धाडसत्र सुरू आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये 60 हून अधिक ठिकाणी आयकर विभागाकडून धाडी टाकल्या जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छापे टाकण्यासाठी आयकर अधिकारी सकाळी 6.30 वाजता वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचले होते. राजकीय पक्षाच्या नावाने देणगी गोळा केल्याप्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे. ही फसवणूक करणाऱ्यांवर आयकर विभाग कारवाई करत आहे. विभागाने उत्तर प्रदेशातील २४ ठिकाणी धाड टाकली. मिळालेल्या माहितीनुसार, करचुकवेगिरीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा आणि गुजरातचा या राज्यांमध्ये आयकर विभागाने वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकली. ही आयकर कारवाई छोट्या राजकीय पक्षांशी संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे.
काही कॉर्पोरेट्स संस्थाही आयकर विभागाच्या निशाण्यावर आहेत. देणग्या दिलेल्यांवर आयकर विभागाचं विशेष लक्ष आहे. कर चुकवण्यासाठी राजकीय नेत्यांना किंवा देणगी देण्यासाठी ज्यांनी पैसा वळवल्या अशा सगळ्यांवर आयकर विभागाने छापा टाकून चौकशी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये 50 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले. तिथल्या व्यापाऱ्याचीही आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली. त्याचवेळी दिल्ली आणि दिल्लीबाहेर कारवाईसाठी निमलष्करी दलाचा वापर केला जात आहे. राजकीय पक्षांना देणग्या कुठून आणि किती येतात, त्याचा तपास सुरू आहे.