गुजरात, 11 सप्टेंबर : सध्या गुजरातमधून (Gujrat) मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. भाजप नेते विजय रुपानी यांच्या राजीनाम्याच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Gujarat Chief Minister Vijay Rupani resign) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय रुपानी यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे.
विजय रुपानी गुजरातमधील राजकोट पश्चिम विधानसभेचे आमदार असून त्यांनी 2016 साली मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आनंदीबेन पटेल यांच्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची सूत्र स्वीकारली होती. विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असणारे रुपानी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यानंतर 1971 साली जनसंघात प्रवेश केला होता. यापूर्वी ते गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. मात्र मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही स्वाभाविक प्रक्रिया असल्याची प्रतिक्रिया रुपानी यांनी दिली आहे.
काय म्हणाले रुपानी… गुजरातच्या विकासाची ही यात्रा नव्या नेतृत्वा वाढायला हवी, यासाठी मी राजीनामा दिला आहे. पार्टीकडून जी जबाबदारी मला सोपवण्यात येईल ती मी पार पाडेन. गेली निवडणूक आणि पोटनिवडणुकीत जनतेने मोठं सहकार्य मिळालं आहे. यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. गुजरात भारतीय जनता पार्टीने गेल्या 5 वर्षांसाठी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती आणि मी माझं कामं प्रामाणिकपणे केलं. पक्षाकडून आम्हाला जबाबदारी दिली जाते, आणि ती आम्ही योग्य प्रकारचे निभावतो.