पाटणा, 9 ऑगस्ट : महाराष्ट्रात शिंदे गटासोबत भाजपने सत्ता स्थापनेनंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. तर बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपची युती तुटली आहे. मंगळवारी सकाळपासून सुरू असलेल्या राजकीय गदारोळात याविषयीची औपचारिक घोषणा केव्हाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सूत्रांकडून समोर आलेल्या वृत्तानुसार दोघेही वेगळे झाले आहेत. मात्र, जेडीयू किंवा भाजपने याबाबत कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दुपारी 4 वाजता बिहारच्या राज्यपालांची भेट घेतील आणि नवीन सरकार स्थापनेचा दावा करतील. बिहारमध्ये सत्तेच्या नव्या समीकरणानुसार जेडीयू, आरजेडी, काँग्रेस आणि डावे पक्ष मिळून सरकार स्थापन करतील. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार 160 आमदारांचे (आरजेडी-79, जेडीयू-45, काँग्रेस-19, डावे-16 आणि अपक्ष-1) समर्थनाचे पत्र घेऊन राजभवनात जाणार आहेत. तत्पूर्वी, महाआघाडीच्या सर्व पक्षांच्या आमदारांनी बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना त्यांच्या पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. महाआघाडीच्या आमदारांचे आभार व्यक्त करताना तेजस्वी यादव म्हणाले की, तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
राऊतांनंतर पवार कुटुंब अडचणीत? लवासाप्रकरणी शरद पवारांसह सुप्रिया, अजित यांना नोटीस
तेजस्वी यादव म्हणाले की, आम्ही प्रत्येक मुद्द्यावर एकत्र काम करू आणि 2020 मध्ये आम्ही जनतेला दिलेले वचन पूर्ण करू. मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वी यादव आपल्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र नितीश कुमार यांच्याकडे सोपवतील, त्यानंतर बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेची औपचारिक घोषणा केली जाऊ शकते. बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेबाबत पाटणा ते दिल्लीपर्यंत हालचाली जोरात सुरू आहेत.