पाटणा 16 नोव्हेंबर: नितीश कुमार बिहारचे सातवे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेत आहेत. राजभवनावर हा शपविधी सोहळा होणार आहे. त्याची तयारीही पूर्ण झाली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी पाटण्यात दाखल झाले आहेत. भाजपने नवी खेळी करत ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा पत्ता कट केला आहे. त्यांना दिल्लीत जबाबदारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजपने तारकिशोर प्रसाद (Tarkishore Prasad) आणि रेणू देवी (Ranu Devi) यांची निवड केली आहे. भाजपने भविष्यातली गरज लक्षात घेऊन नवीन चेहेऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. सुशील कुमार मोदी हे दीर्घकाळापासून नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. या बदलाचे संकेत त्यांनी रविवारीच ट्विटरवर दिले होते. नितीश यांच्यासोबत 14 मंत्री शपथ घेणार आहेत. त्यात जेडीयूकडून मेवालाल चौधरी, अशोक चौधरी, शीला मंडल, विजय चौधरी, विजेंद्र यादव, यांचा समावेश आहे. तर भाजपच्या कोट्यातून तारकिशोर प्रसाद, रेणू देवी, अमरेंद्र प्रताप सिंह, मंगल पाण्डेय, रामसूरत राय, रामप्रीत पासवान आणि जीवेश मिश्रा हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याच बरोबर हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे संतोष मांझी आणि विकासशील इंसान पार्टीचे मुकेश सहनी हेही मंत्रिपदाची शपध घेणार आहेत. या निवडणुकीत NDAला 125 जागा मिळाल्या आहेत. त्यात भाजप 73, जेडीयू 43, हिंदुस्तान आवाम मोर्चा आणि विकास इंसाफ पार्टीला प्रत्येकी 4 जागा मिळाल्या आहेत. या पक्षांना त्यांना मिळालेल्या जागांप्रमाणे मंत्रिपदं देण्यात आली आहेत. RJD आणि काँग्रेससह महाआघाडीनेच या शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे.
भाजपच्या सगळ्या वाटाघाटीमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रातल्या जागा वाटपापासून ते सत्तेतल्या वाटणीपर्यंत सगळा अनुभव पाठीशी असल्याने पक्षनेतृत्वाने फडणवीसांना ही मोठी जबाबदारी दिली होती.