बांदा : रक्षाबंधनाचा उत्साह देशभरात सुरू आहे. भावा-बहिणींच्या प्रेमाचा हा दिवस एकीकडे साजरा होत असताना दुसरीकडे मोठी दुर्घटना घडली. यमुना नदीमध्ये बोट बुडाल्याची माहिती मिळाली आहे. या बोटीमध्ये अनेक स्त्रिया-महिला रक्षाबंधन साजरी करण्यासाठी जात असताना काळाने घात केला. मिळालेल्या माहितीनुसार या बोटीमध्ये 60 प्रवासी होते. त्यापैकी 30 हून अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. रक्षाबंधनाला गालबोट लागलं आहे. तर 11 जणांनी नदीतून पोहत बाहेर येऊन आपला जीव वाचवला. गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. महिला रक्षाबंधनासाठी या बोटीतून नदी पार करून जात असताना ही दुर्घटना घडली. दुर्घटनेची माहिती मिळताच DIG, NDRF आणि SDRF टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत 4 मृतदेह बाहेर काढले आहेत. तर अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात बांद्याहून फतेहपूरला जात असताना यमुना नदीमध्ये घडली आहे. रक्षाबंधनासाठी महिला मरका घाटाजवळ पोहोचल्या. नदी पार करण्यासाठी त्यांना बोटीतून प्रवास करावा लागला. नदीच्या मध्यभागी पोहोचताच लोकांनी भरलेली बोट उलटली.
मिळालेल्या माहितीनुसार बोटीचं संतुलन बिघडल्याने ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.