भोपाळ, 26 जून: भाजप (BJP MP) खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर ( Pragya Singh Thakur ) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या भोपाळमधील भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पुन्हा एकदा त्यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपची कोंडी होणार असल्याचंच चित्र दिसत आहे. हेमंत करकरे हे काही लोकांसाठी देशभक्त असतील, मात्र मी करकरेंना देशभक्त मानत नाही, असं वादग्रस्त वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलं आहे. यासंदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. NDTVनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. करकरेंबद्दल काय म्हणाल्या भाजप खासदार? हेमंत करकरे काही लोकांसाठी देशभक्त असतील. पण खरे देशभक्त असलेले लोक त्यांना देशभक्त मानत नाहीत. देशासाठी मी माझं जीवन समर्पित केलं आहे. माझ्यासारख्या स्वयंसेवकाला त्यांनी त्रास दिला, असं त्या म्हणाल्या आहेत.
माझ्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी करकरेंनी आपल्याला शिक्षण देणाऱ्या आचार्य-शिक्षकाची बोटं आणि बरगड्या मोडल्या. मला खोट्या प्रकरणात गोवलं, असं आरोप प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला आहे. देशात 1975 मध्ये पहिल्यांदाच आणीबाणी लागू झाली होती. तशीच एक आणीबाणी 2008 साली लागल्याचं सांगत मला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मला गोवण्यात आलं आणि मला अटक झाली, असंही त्या म्हणाल्या. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या 2008 साली मालेगावात झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. या बॉम्बस्फोटात 10 जण ठार तर 82 जण जखमी झाले होते. त्यावेळचे महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी त्यांना अटक करुन त्यांची चौकशी केली होती. हेही वाचा- ईडीच्या रडारवर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का याआधीही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हेमंत करकरे यांच्यावर धक्कादायक विधान केलं होतं. आपल्या शापामुळेचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी करकरे ठार झाले, असं वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काही वर्षांपूर्वी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आताही त्यांनी पुन्हा एकदा करकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं.