Photo-ANI
बोनगाईगाव (आसाम) 31 ऑगस्ट : आसाम सरकारच्या यंत्रणांनी बोनगाईगावमधल्या एका मदरश्यावर बुल्डोझर (Assam Madarsa JCB) चालवला आहे. मदरश्याच्या जागेचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होत असल्याच्या आरोपामुळे आसाम सरकारने ही कारवाई केली आहे. बोनगाईगाव भागातल्या कबियत्री गावात असलेल्या मरकझुल मअरीफ कुरियाना मदरसा पाडण्यासाठी बरेच जेसीबी आणण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बोनगाईगावच्या जिल्हा प्रशासनाने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेन्ट (AQIS) आणि अनसरउल्लाह बांगला टीम (ABT) या दहशतवादी संघटनांशी कनेक्शन असल्याच्या संशयावरून पोलिसांनी 37 जणांना अटक केली होती, यामध्ये मदरश्याचा इमाम आणि शिक्षकाचा समावेश होता. अटकेच्या या कारवाईनंतर आसाम सरकारने पाडलेला हा तिसरा मदरसा आहे. आसाममध्ये काही दहशतवादी धार्मिक शिक्षक असल्याचं सांगत आले आहेत, ज्यामुळे राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, अशी गुप्त माहिती आसाम सरकारला यंत्रणांकडून मिळाली होती, असं वृत्त एएनआयने दिलं आहे. काल रात्री मदरश्यामधल्या 224 विद्यार्थ्यांना दोन मजली इमारतीतून तर मदरश्यामधले शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना शेजारच्या इमारतीतून बाहेर काढण्यात आलं. 30 ऑगस्टला गोलपरा जिल्ह्याच्या पोलिसांनी धाड टाकली, यामध्ये त्यांना काही महत्त्वाची कागदपत्रं हाती लागली. यामध्ये अनसरउल्लाह बांगला टीमचं बंगाली भाषेत लिहिलेलं एक पान आहे. तसंच अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेन्टचा लोगो असल्याचाही पोलिसांना संशय आहे. जिल्हा प्रशासनाने 30 ऑगस्टला दिलेल्या ऑर्डरनुसार मदरश्याचं बांधकाम राहण्यासाठी सुरक्षित नाही, तसंच हा मदरसा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नियमानुसार बांधण्यात आला नाही, असं बोनगाईगाव जिल्ह्याचे एसपी स्वप्नील डेका म्हणाले. ‘काल गोलपरा जिल्ह्याच्या पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये मदरश्यामधल्या एकाला अटक करण्यात आली, त्याची लिंक AQIS आणि ABT या दहशतवादी संघटनांशी आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार मदरश्याच्या पाडकामाला सुरूवात झाली आहे,’ असं वक्तव्य एसपींनी केलं. 30 ऑगस्टलाच आसाम सरकारने बारपेटा जिल्ह्यातल्या ढकालीपारा भागताला मदरसाही याच आरोपांखाली पाडला होता. शेखुल हिंद महमदुल हसन जैमुल हुदा इस्लामिक ऍकेडमी या मदरश्यावर कारवाई करण्यात आली होती. ही जमीन सरकारी असल्याचा दावाही प्रशासनाने केला. ‘ही शैक्षणिक संस्था देशविरोधी आणि जिहादी कारवायांमध्ये सहभागी आहे. आम्ही इकडे येऊन पाहणी केली असता, ही संस्था सरकारच्या जमिनीवर उभी असल्याचं दिसलं, तसंच जागेचा मालकही सापडला नाही, त्यामुळे आम्ही लगेचच हे पाडायचा निर्णय घेतला,’ असं ऍडिशनल डेप्युटी कमिशनर लचित कुमार दास म्हणाले. ‘मदरश्याचं प्रशासन संस्था चालवत नव्हतं तर दहशतवादी कारवायाचं केंद्र बनलं होतं. आमच्याकडे तक्रार दाखल झाल्यानंतर आम्ही तपास करून कारवाई करणार,’ असं वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी केलं. महिन्याच्या सुरूवातीलाही आसाम सरकारने मोरीगाव जिल्ह्यातल्या मोईराबारी भागातल्या जैमुल हुदा मदरश्यावरही बुल्डोझर चालवून कारवाई केली होती.