हरियाणा, 29 एप्रिल: हरियाणातील (Haryana) झज्जर (Jhajjar) शहरात रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मोठी दुर्घटना (big accident) घडली. बेरी गेट परिसरात असलेल्या कात बनवणाऱ्या कारखान्यात अमोनिया गॅस (Ammonia Gas Leak) सिलिंडरमधून बाहेर पडणाऱ्या पाईपला गळती लागली होती. या गळतीमुळे रहिवासी भागात प्रचंड घबराट पसरली होती. गॅस गळतीनंतर अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, उलट्या होऊ लागल्या. याची माहिती मिळाल्यानंतर अनेकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. मध्यरात्री कात बनवण्याच्या प्लांटमध्ये अमोनिया गॅसची गळती झाल्यानं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. प्रशासनाचे संपूर्ण कर्मचारी तात्काळ मदतीसाठी आले. तोपर्यंत सुरु असलेली काही दुकानेही पोलिसांनी बंद करण्यास सुरुवात केली. लोकांना खबरदारी घेण्यास सांगितलं जात होतं. आजूबाजूचे काही भाग पूर्णपणे रिकामे करण्यात आले कारखान्यातील कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढण्यात आले असून आजूबाजूचा काही भाग पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. कोणतीही जीवित आणि वित्तहानी होऊ नये म्हणून कारखाना परिसरापासून दूर जाण्यास सांगण्यात आलं. रस्त्यावर पाण्याचा फवारा हवेत पसरलेल्या वायूला आळा घालता यावा म्हणून अग्निशमन दलाच्या गाड्यांनी रस्त्यावर पाण्याचा फवारा मारला. मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या टाकीतून निघणाऱ्या पाईपमधून अमोनिया गॅसची गळती होत होती. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि ही बातमी पसरताच सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाच्या दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावली दरम्यान, मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या दोन जवानांची प्रकृतीही बिघडल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर घटनास्थळी दोन रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या. याशिवाय अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.