07 मार्च : भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पुतळ्यांच्या तोडफोडी संदर्भात ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावर त्यांनी तीव्र नाराजी दर्शवली असून पुतळ्यांच्या तोडफोडी प्रकरणी भाजपच्या एकाही कार्यकर्त्याचा संबंध असल्यास अथवा निदर्शनास आल्यावर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अमित शहा यांनी दिला आहे. शिवाय त्रिपुरा आणि तामिळनाडूतल्या भाजप शाखांशी देखील मी बोललो असल्याची प्रतिक्रिया अमित शहांनी ट्विटरवर दिली आहे.
त्रिपुरामधल्या विजयानंतर भाजपनं व्लादिमीर लेनिन यांचा पुतळा बुलडोझरनं पाडला, ज्यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या. भाजपच्या या कृत्याचा सर्व स्तरांतून निषेध झाला, संपूर्ण त्रिपुरात हिंसाचार उफाळलाय. 13 पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यानंतर तामिळनाडूत इ.व्ही रामस्वामी अर्थात पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आलीये. तामिळनाडूच्या वेल्लोर तालुक्यात ही घटना घडलीये. या पुतळ्याचं नाक आणि चष्म्याची तोडफोड करण्यात आलीये. तर आज सकाळी पश्चिम बंगालमधील जाधवपूर विद्यापीठातील शामाप्रसाद मुखर्जींचा पुतळ्याला अज्ञातांनी काळं फासलं.