नाशिक, 17 ऑक्टोबर: सध्या बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) आणि अरबी समुद्रात (Arabian sea) दोन वेगवेगळे हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्र निर्माण झालं (Low pressure area) आहे. दोन्ही ठिकाणी हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होतं असल्याने याचा मान्सूनवर परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यात दिवस मान्सूनचा मुक्काम वाढला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शनिवारी केरळात धुव्वाधार पाऊस कोसळून अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम आता महाराष्ट्रात देखील जाणवणार आहे. आज राज्यातील एकूण अकरा जिल्ह्यांना हवामान खात्याने (IMD) येलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने आज नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या अकरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. तर पुढील तीन तासात जालना, औरंगाबाद, जळगाव आणि विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
पण उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. उद्यापासून राज्यात पुढील चार दिवस कोणताही इशारा दिला नाही. चारही दिवस राज्यात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जेनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, कोकण आणि घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसानं उसंत घेतली आहे. तसेच घाट परिसरात किमान तापमानात घट होऊन पहाटे हवेत गारवा जाणवत आहे. मुंबईत मात्र अद्याप गरम आणि दमट हवामानाची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा- भारत विक्रमी 100 कोटी लसीकरणाच्या अगदी जवळ; या आठवड्यात घडेल इतिहास खरंतर, दरवर्षी 17 ऑक्टोबरला मान्सून राज्यातून परततो. 6 ऑक्टोबरपासून देशातून मान्सूच्या परतीचा प्रवास सुरू झाला होता. पण सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे परतीच्या वाटेवरील पाऊस महाराष्ट्र आणि ईशान्यकडील काही राज्यात अडकला आहे.