नागपूर, 30 मे: तरुणांचं व्यक्त होण्याचं हक्काचं माध्यम म्हणून सोशल मीडियाला (social media) ओळखलं जातं. पण काहीजण या माध्यमाचा गैरवापरही करतात. त्यामुळे सोशल मीडियावरील इतरांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका अल्पवयीन मुलाने सोशल मीडियावर अक्षरशः हैदोस घातला आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह भाषेचा (Abusive language) वापर करत अनेक महिला आणि मुलींना मानसिक त्रास दिला. याप्रकरणी अनेकजणींनी वेगवेगळ्या ठिकाणी संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपी गुजरातमधील रहिवासी असून त्याने महाराष्ट्रासह इतर राज्यातील मुलींशी आणि महिलांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत त्यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन केलं आहे. संबंधित आरोपीने अत्यंत लज्जास्पद भाषेचा वापर करत महिला आणि मुलींची बदनामी सुरू केली आहे. याप्रकरणी नागपूरात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाचा शोध लावला आहे. संबंधित आरोपी हा गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू असल्याने संबंधित आरोपीला गुजरातमध्ये जावून अटक करणं शक्य नसल्यानं नागपूर पोलिसांनी स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यावेळी स्थानिक पोलिसांनी तपास केला असता संबंधित आरोपी 16 वर्षाचा अल्पवयीन असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. यावेळी पोलिसांनी आरोपीकडून काही सीम कार्ड आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. आरोपी अल्पवयीन असल्यानं पोलिसांनी त्याला ताकीद देऊन सोडून दिलं आहे. पण माफीनामा लिहून सुटका झाल्यानंतरही त्यानं मुलींना त्रास देणं सुरूच ठेवलं आहे. हे ही वाचा- Facebook वरील मैत्री पडली महागात, तरुणीनं घातला दहा लाखाचा गंडा लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थीनीशी संपर्क करायचा. त्यानंतर ऑनलाईन संपर्कात राहून त्यांच्याशी घाणेरड्या भाषेत संवाद साधायचा. मुलींनी त्याच्यावर आक्षेप घेतला किंवा ब्लॉक केलं, तर आरोपी स्वतःच्या आणि संबंधित मुलीच्या नावाने बनावट खाते काढून नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना अत्यंत अश्लील मेसेज पाठवून संबंधित मुलीची बदनामी करायचा. त्याचबरोबर व्हिडीओ कॉल करूनही अश्लील कृत्य करायचा. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.