मुंबई 09 मार्च : मराठीत भाषण न केल्यामुळे आपला अपमान करण्यात आला. कार्यक्रमाच्या स्टेजवरच शिवसेनेच्या नेत्यांनी अपमान केल्याचा आरोप राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या झेन सदावर्तेने केला आहे. झेनने मुंबईत लागलेल्या आगीत धाडस दाखवत 13 जणांचे प्राण वाचवले होते. त्यानिमित्त तिला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला होता. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर तिचा दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कारही करण्यात आला होता. हा पुरस्कार मिळविणारी ही मुंबईची कन्या असल्यामुळे तिचा शिवसेनेच्या वतीने मुंबईत सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी झेन भाषण करत असतानाच मानापमानाचं नाट्य रंगल. माझा अपमान करण्यात आल्याचा आरोप झेनने केलाय. तर विषय सोडून अनावश्यक प्रश्न इंग्रजीत मांडत असल्यानेच तिला रोखलं असं स्पष्टीकरण शिवसेनेनं दिलं आहे. झेन मंचावरू इंग्रजीत बोलत होती. काही प्रश्न तिने मांडले. मात्र तिच्या स्टाईलवरून स्टेजवरच नाराजी दिसून येत होती. तिथे उपस्थित असलेला प्रेक्षक वर्ग हा मराठी असल्याने त्यांच्यातही चलबिचल सुरू झाली होती. त्यामुळे संयोजकांनी झेनला भाषण आटोपतं घेण्याची सूचना केली मात्र ती आणखी मोठ्या आवाजात बोलत राहिली. जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईत शिवसेनेच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात हे नाट्य घडलं. त्यानंतर मात्र शिवसेनेच्या महिला नेत्याने पुढे येत तिच्या हातातला माईक काढून घेतला आणि तिला स्पष्टपणे सांगितलं की तु उत्तम काम केलं आहे. तुझा आम्हाला अभिमानच आहे. मात्र इथे उपस्थित असेला प्रेक्षकवर्ग आणि तुझं वय बघता तु त्याच प्रमाणे बोलणं अपेक्षित होतं. महाराष्ट्रात बोलताना मराठीच बोललं पाहिजे असं या नेत्याने तिला सांगितलं. तरीही झेन मंचावरच वाद घालत राहिली.
नागरीकांना पाहिजे त्या भाषेत बोलण्याचं स्वातंत्र्य घटनेनं दिलंय. त्यामुळे माझ्यावर जबरदस्ती होऊ शकत नाही असं झेनचं म्हणणं आहे.