मुंबई 25 डिसेंबर : सरकार बदललं की अनेक गोष्टी बदलत असतात. काहींना याचा फायदा होतो तर काहींना तोटा. महाराष्ट्रात फडणवीस सरकार जावून ठाकरे सरकार आलं आणि त्यांनी अनेक गोष्टींचा फेरआढावा घ्यायला सुरुवात केली. या फेरआढाव्याचा दणका आता आघाडीच्या Axis Bankला बसणार आहे. या बँकेत तब्बल 2 लाख पोलिसांचे सॅलरी अकाउंट्स (Salary Accounts) आहेत. ती सर्व खाती आता सरकारी मालकीच्या SBIमध्ये वर्ग करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती पुढे आलीय. राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय होणार असल्याचं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे अमृता फडणवीस(Amruta Fadnavis) या बँकेत त्यावेळी उच्च पदावर होत्या. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना पोलिसांची वेतन खाती Axis Bankमध्ये वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून त्यावेळी वादही झाला होता. या आधी पोलिसांची बँक खाती ही SBIमध्ये होती. ती खाती Axis Bankमध्ये वळविण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर बहुतांश खाती ही स्टेट बँकेत वळविण्यात आली होती. पोलिसांच्या या दोन लाख खात्यांमध्ये दर महिन्यात त्यांच्या वेतनाचे तब्बल 11 हजार कोटी रुपये जमा होतात अशी माहिती ‘मुंबई मिरर’ने दिली आहे.
हा निर्णय झाला तर Axis Bankला आपला मोठा ग्राहक गमवावा लागणार आहे. केवळ अमृता फडणवीस असल्यामुळेच तत्कालीन राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याची टीका झाली होती. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने अशा कामांसाठी ज्या काही बँकांची निवड केली होती त्यात अॅक्सिस बँकेचाही समावेश होता. त्यामुळे आमचं सरकार असताना तो निर्णय घेतला गेला. केवळ माझी पत्नी त्या बँकेत नोकरी करत होती म्हणून राजकीय भावनेतून टीका केली जातेय असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचंही मिररने म्हटलं आहे.