शहीद मेजर कौस्तुभ राणेंसाठी बहिणींनी आणल्या होत्या राख्या, केक आणि चॉकलेट पण...

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना मंगळवारी शहीद कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. काल ९ ऑगस्ट रोजी मिरो रोड येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. ते २९ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी हजोरो संख्येने नागरिक मिरा रोड येथील त्यांच्या राहत्या घराजवळ जमा झाले होते. प्रत्येकाच्या तोंडी कौस्तुभ राणे अमर रहे.... जब तक सूरज चाँद रहेना कौस्तुभ तेरा नाम रहेगा... भारत माता की जय... याच घोषणा होत्या. लहान मुलांपासून ते थोरा-मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण कौस्तुभ यांना सलाम करीत होते. त्यांच्या पार्थिवावर फूल वाहिली जात होती. कौस्तुभ यांच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यंत जाणारी वाट ही फुलांनी सजवली होती.

मेजर कौस्तुभ यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मिरा रोड, भाईंदरमधून २५ हजारांपेक्षाही अधिक नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्याक्षणाला जेवढे दुःख राणे कुटुंबियांना झाले तेवढेच तिथे उपस्थितांनाही झाले होते. इमारतींच्या गच्चीपासून ते घराच्या खिडक्यांपर्यंत सगळीकडून नागरिक हात जोडून कौस्तुभला अभिवादन करत होते. स्मशानभूमीत कौस्तुभ यांचे शव आणल्यानंतर एक अशी गोष्ट घडली ज्याने साऱ्यांचे मन सुन्न झाले. कौस्तुभ यांच्या लहान बहिणीने कौस्तुभ यांच्या आवडीचे चॉकलेट्स आणि काही भेटवस्तू त्यांना काश्मिरला जाताना दिल्या होत्या. त्या वस्तू बहिणीने शवपेटीजवळ आणून ठेवल्या, तेव्हा उपस्थितांचे मन हेलावले. दोन बहिणींनी रक्षाबंधन जवळ येत असल्यामुळे त्यांच्यासाठी राख्या आणल्या होत्या. त्या राख्याही त्यांनी शवपेटीजवळ ठेवल्या तेव्हा अनेकांना आपले अश्रू रोखणे शक्य झाले नाही. बहिणींनी भावाला अशापद्धतीने अखेरचा निरोप दिला. पोटच्या मुलाला गमावण्याचे दुःख शब्दात मांडणं आजतागायत कोणालाही शक्य झालं नाही. मुलाच्या मृत्यूची वार्ता कळल्यापासून ते त्याच्या अंत्यसंस्कारापर्यंतचा संपूर्ण वेळ वडील प्रकाशकुमार, आई ज्योती, पत्नी कनिका, दोन वर्षांचा मुलगा अगस्त्य, बहीण कश्यपी धैर्याने साऱ्याला सामोरे जात होते. पत्नी कनिका यांनी मेजर राणे यांच्या पार्थिवावरील राष्ट्रध्वज स्वीकारला आणि आपल्या हृदयाशी लावला तेव्हा मात्र कोणीच आपल्या भावना रोखू शकले नाही. आयुष्याच्या जोडीदाराला अखेरचा सलाम देताना कनिका आणि संपूर्ण राणे कुटुंब स्वतःला रोखू शकलं नाही.

Trending Now