मुंबई, 25 नोव्हेंबर : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आता आणखी एक नवा आरोप केला आहे. समीर वानखेडेंच्या मातोश्री जाहिदा यांचे दोन मृत्यूचे दाखले बनवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिकांनी ट्विट करत या आरोपाच्या संदर्भात दोन कागदपत्रेही आपल्या ट्विटमध्ये जोडली आहेत. नवाब मलिकांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, आणखी एक फर्जीवाडा, अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी नोंदीसाठी हिंदू? (Nawab Malik new allegation against Sameer Wankhede) नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये समीर वानखेडे यांच्या आई जाहिदा यांचे मृत्यूचे दाखले जोडले आहेत. या मृत्यूच्या दाखल्यांच्या आधारे नवाब मलिक दावा करत आहेत की, जाहिदा यांच्यावर मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच जाहिदा यांच्या निधनानंतर वानखेडे कुटुंबियांनी मृत्यूचे दोन दाखले सादर केली. मृत्यूच्या एका दाखल्यात जाहिदा यांचा धर्म हिंदू असे लिहिले आहे. तर दुसऱ्या प्रमाणपत्रात जाहिदा यांचा धर्म मुस्लिम असल्याचं म्हटलं आहे. जाहिदा यांचे निधन 16 एप्रिल 2015 रोजी झाले. मृत्यूचा पहिला दाखला 16 एप्रिल 2015 रोजी तयार करण्यात आला ज्यामध्ये जाहिदा यांचा धर्म मुस्लिम असे लिहिले होते. वाचा : कथित चॅटच्या स्किनशॉट प्रकरणी क्रांती रेडकरांची पोलिसात तक्रार, नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार?
तर मृत्यूचा दुसरा दाखला 17 एप्रिल 2015 रोजी तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये जाहिदा यांचा धर्म हिंदू असे लिहिण्यात आलं आहे असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे. मृत्यूच्या या दोन्ही दाखल्यांच्या आधारे मंत्री नवाब मलिक दावा करत आहेत की, जाहिदा यांच्या मृत्यूनंतरही वानखेडे कुटुंबीयांनी बनावट कागदपत्रे तयार करुन दोन वेगवेगळे मृत्यू दाखले बनवून घेतली आहेत. हायकोर्टाचा समीर वानखेडेंना दणका, नवाब मलिकांना रोखण्यास दिला नकार राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकापाठोपाठ आरोपांची मालिका सुरू केली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. पण, हायकोर्टाने याचिकाच फेटाळून लावत वानखेडेंना दणका दिला आहे. समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांना मुंबई हायकोर्टात याची दाखल केली होती. पण, 22 नोव्हेंबर रोजी कोर्टाने त्यांना दिलासा दिला नाही. नवाब मलिक यांना समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात काहीही आक्षेपार्ह बोलण्यास मनाई करण्यास मुंबई हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, नवाब मलिक यांना यापुढे वाजवी पद्धतीने माहितीची खातरजमा करूनच ट्विट करण्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहे.