मुंबई, 27 सप्टेंबर: आज मुंबईत (Mumbai Vaccination) फक्त महिलांचं लसीकरण (Women Vaccination) होणार आहे. आज मुंबई पालिकेनं (BMC) फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवलं आहे. मुंबई महापालिकेनं गेल्या आठवड्यातही महिलांसाठी विशेष लसीकरण सत्र राबवलं होतं. या विशेष सत्राला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आजही मुंबई पालिकेकडून महिलांसाठी विशेष लसीकरण सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. कोविड- 19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड 19 लसीकरण केंद्रांवर, सोमवार ( 27 सप्टेंबर 2021) रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत, फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवले जाणार आहे.
या विशेष लसीकरण सत्रात महिलांना थेट लसीकरण केंद्रावर येऊन कोविड लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेता येईल. या विशेष सत्राच्या पार्श्वभूमीवर आजसाठीची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात आलं आहे. मुंबईतील सर्व 227 निर्वाचन प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयं आणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट येऊन (वॉक इन) महिलांना कोविड लस घेता येईल.
उद्या शिक्षक विद्यार्थ्यांचं लसीकरण
दरम्यान उद्या म्हणजेच मंगळवारी ( 28 सप्टेंबर)ला सकाळी 9 ते दुपारी 2 या पहिल्या सत्रात, शिक्षक तसंच 18 वर्ष आणि त्यावरील वयाचे विद्यार्थी यांचं कोविड लसीकरण होणार आहे. तसंच दुसऱ्या सत्रात म्हणजे दुपारी 3 ते रात्री 8 या वेळेत दुसरा डोस देय असणाऱ्या नागरिकांचं लसीकरण करण्यात येणार आहे.