देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 33 लाखांच्या वर गेली आहे.
मुंबई, 26 जुलै : मुंबईतील काही भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. मुंबईत 29 मतिमंद मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मतीमंद मुलांचे वसतिगृह असलेल्या चिल्ड्रन एड सोसायटी मानखुर्द येथील ही सर्व मुले असल्याची माहिती आहे. मतीमंद मुलांपैकी 24 मुले व 5 मुली तपासणी अंती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. सर्व मुलांना विविध आजार असल्याने सर्वांना उपचारासाठी आणि संसर्ग वाढू नये यासाठी विलगीकरण कक्षात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तर यातील दोघांना रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. वस्तीगृहात बंदी असतानाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कोरोनाचा शिरकाव झाला तरी कसा, याचा आता संबंधित यंत्रणेकडून शोध घेण्यात येत आहे. हेही वाचा - मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी नवा प्रयोग, 9 गोष्टींच्या आधारे घातक व्हायरसला हरवणार दरम्यान, मुंबईतील कोरोनाच्या स्थितीवरून विरोधी पक्षाकडून ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे. मुंबईत सातत्याने कमी चाचण्यांमुळे मृत्यूदर वाढतो आहे. शिवाय, संसर्गाचे प्रमाण सुद्धा चिंताजनक आहे. त्यामुळे तातडीने चाचण्यांच्या संख्येवरील मर्यादा हटवून मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्याची गरज आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.