मुंबई 10 सप्टेंबर: केंद्रीय रामदास आठवले यांनी गुरूवारी सायंकाळी अभिनेत्री कंगना रणौतची भेट घेतली. आठवले कंगनाच्या मुंबईतल्या घरी गेले आणि तिच्याशी चर्चा केली. आठवले म्हणाले, आपल्याला राजकारणात प्रवेश करायचा नाही आणि आवडही नाही असं कंगनाने सांगितलं आहे. मात्र तिने भाजप किंवा आरपीआयमध्ये प्रवेश केल्यास तिचं स्वागत आहे. आठवले पुढे म्हणाले, जमेल तेवढं चित्रपटात काम करायचं आहे असं कंगनाने सांगितलं आहे. तिला समाजात एकता निर्माण करायची आहे असंही तिने म्हटलं आहे. आगामी चित्रपटात ती दलीत मुलीची भूमिका करणार असल्याचंही तिने सांगितल्याचं आठवले म्हणाले. दरम्यान कंगना प्रकरणावर आज शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची बैठक झाली त्यानंतर राऊतांनी भूमिका जाहीर केली. कंगना रणौत प्रकरणावर राज्यात वादळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पक्षाची पुढची दिशा आणि रणनीती काय राहिल हे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत पक्षासंदर्भात चर्चा झाली.
सोनिया, पवार नाराज असल्याची अफवा पसरवू नका, असं काहीही नाही. कंगना हा विषय आमच्यासाठी संपला आहे, आम्ही ते विसरून गेलोय. आम्ही आमच्या नेहमीच्या सामाजिक, राजकीय कामाला लागलोय. ती काय ट्विट करतंय ते वाचले नाही, आम्ही फक्त सामना वाचतो. असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावरून पवारांनी बुधवारी दिलेला सल्ला शिवसेनेने मनावर घेतला असं बोललं जात आहे. या प्रकरणाला जास्त महत्त्व देऊ नये असं पवारांनी म्हटलं होतं. कंगना शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आहे. दरम्यान बीएमसीने कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर केलेली कारवाई सुडबुद्धीतून केल्याचा आरोप देखील शिवसेनेवर करण्यात आला. बीएमसीने बुधवारी केलेल्या कारवाईनंतर देखील काही ट्वीट कंगनाने केले होते.