मुंबई, 26 फेब्रुवारी : तीरा कामत ही अवघ्या 6 महिन्यांची गोंडस चिमुकली एका दुर्धर आजाराने लढत आहे. ही मुलगी एसएमए टाइप 1 (SMA Type 1) या अत्यंत दुर्मीळ आजाराने पीडित आहे. तिला या आजारातून बाहेर पडण्यासाठी तब्बल 16 कोटी रुपयांचं झोलजेन्स्मा’ या औषधाची आवश्यकता होती. आज देशातील नागरिकांनी केलेल्या पुढाकारामुळे तीराला झोलजेन्स्मा औषधं देण्यात आलं आहे. सध्या तीराला माहीमच्या पी. डी हिंदुजा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. हे औषध दिल्यानंतर शनिवारी रुग्णालयातून तीराला घरी सोडण्यात येईल, असंही सांगितलं जात आहे. आज साधारण सकाळी 10.30 वाजता तीरावर उपचार सुरू करण्यात आले. याबद्दल तिच्या आई-वडिलांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे. त्यांनी तीराला वाचवण्यासाठी एक मोहीम चालवली होती. यामध्ये अनेकांनी तिच्यावर उपचार करण्यासाठी मदत केली. यानंतर राज्य सरकारनेही यासाठी एक पाऊल पुढे आले.
हे ही वाचा-आबांची जादू आजही; आर.आर पाटील यांचं नाव घेतलं आणि 40 कोटी जास्त मिळाले काय आहे एसएमए टाइप 1 आजार हा आजार जेनेटीक डिसिज म्हणजे, जनुकीय बदलांमुळे होणारा आजार आहे. शरीराचे स्नायू अत्यंत कमकूवत होतात. पहिल्यांदा हात, पाय आणि त्यानंतर फुप्फुसांच्या स्नायूंची शक्ती कमी होते. रुग्ण रेस्पिरेटरी पॅरलेसिसमध्ये जातो. तज्ज्ञांच्या मते हा आजार दिवसेंदिवस वाढत जाणारा आहे. या आजारातून बचाव होऊ शकतो, असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र यासाठी अमेरिकेतील महागड्या 16 कोटींच्या इंजेक्शनची गरज असते. तीराच्या आजाराबद्दल कळताच तिच्या पालकांनी लोकांना मदतीचं आवाहन केलं. चिमुकल्या तीराला वाचविण्यासाठी अख्खा देश एकत्र आला व त्यांनी 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन खरेदी केलं. दरम्यान हे औषध भारतात आणण्यासाठी 6 कोटींचा टॅक्सही लागणार होता. मात्र राज्य सरकार व काही राजकीय नेत्यांच्या मदतीने हा टॅक्सही रद्द करण्यात आला व तीराला नवसंजीवनी मिळाली.