मुंबई 22 मार्च : देशात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे हे सध्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टोपे यांच्या मुलाखतीला व्हिडीओ ट्विट करून त्यांना कौतुकाची थाप दिलीय. टोपे यांच्या आईंवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अशाही परिस्थितीत महाराष्ट्राचा हा लढवय्या कोरोनाशी लढतो आहे असं कौतुक जयंत पाटील यांनी केलं आहे. ते म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी राज्यसरकारने कंबर कसली आहे. आरोग्यमंत्री या नात्याने टोपे अहोरात्र झटतायेत. राज्यातील प्रत्येक माणसाच्या स्वास्थाची काळजी करणाऱ्या शरद पवारांच्या शिलेदाराला सलाम, जनसेवेसाठी सदैव कार्यरत रहा या शुभेच्छा! संकट मोठंय पण त्यावर मात करू. जयंत पाटील यांच्या कौतुकाला टोपे यांनीही उत्तर दिलं आहे. सन्माननीय जयंतराव पाटील साहेब, आपण जी कौतुकाची थाप दिली त्यामुळे मला दुप्पट काम करण्याची ऊर्जा मिळणार आहे. ‘Work is worship’ या उक्तीप्रमाणे कार्य करत राहणार. आदरणीय पवार साहेब, खा.सुप्रियाताई, ना.अजितदादा आणि आपल्या सारखे ज्येष्ठ सहकारी यांचा आभारी आहे.
कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवत वाढत आहे. ही संख्या लक्षात घेता या रुग्णांची चाचणी करण्याकरता अधिक चाचणी केंद्रे उपलब्ध व्हावेत, या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च अँड इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे आणखी केंद्रांना नव्याने मान्यता देण्याची विनंती केली होती. मुंबईसह पुण्यात कोरोना तपासण्यांची क्षमता लवकरच 100 हून 2200 करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. मुंबईतील परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटल यांना करोना चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि खासगी केंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत कोरोना तपासण्यांची क्षमता शंभराहून बावीसशे पर्यंत वाढविण्यात येत आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज मुंबई येथे दिली.