नवी मुंबई महापालिका
प्रमोद पाटील, प्रतिनिधी नवी मुंबई, 18 मे : नवी मुंबई स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, याच स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असल्याचे दिसत आहे. स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई शहराला आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक भिंतीला आकर्षक रंगरंगोटी केली जात आहे. मात्र, या कामाचे ठेके अधिकृत निघाले नसल्याचे समोर आले आहे, अनेक कामे ठेक्याशिवाय दिले असून केवळ तांत्रिक बाबींच्या आधारे कामे सुरू आहेत. त्यामुळे या कामात पारदर्शकता दिसत नाही. केवळ शहराला आकर्षक दिसण्यासाठी रंगरंगोटीवर करोडो रुपयांचा चुराडा करणे कितपत योग्य आहे? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. याबाबत अनेक भिंती अशा आहेत, ज्यांचे आधीचे रंग चांगले असताना पुन्हा त्याच भिंतीना रंग लावले जात आहेत, त्यामुळे केवळ सुंदरतेचा आव आणण्यासाठी पुन्हा त्याच भिंती रंगवल्या जात आहे, ज्यांचे आधीचे रंग चांगले आहेत, एका बाजूला पावसाळा अगदी तोंडावर आहे, त्यामुळे या पुन्हा रंगवलेल्या भिंतींचे रंग किती टिकतील ते पावसाळ्यात खराब होणार नाहीत का? त्यामुळे याला भ्रष्टाचार नाही म्हणायचं मग काय म्हणायचं? असा सवाल माजी नगरसेवक राजू शिंदे यांनी केला आहे. या संपूर्ण कामाचे ऑडिट झाले पाहिजे, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. नवी मुंबईत अनेक ठिकाणी हे चित्र आहे, त्यामुळे पालिकेच्या या कारभारावर संशय येत असून याची चौकशी होणे आवश्यक आहे. तर आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या बाबत आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत, काही कामांना तांत्रिक मान्यता दिली आहे. काहींचे ठेके निघाले आहेत, अशी कबुली यावेळी त्यांनी दिली. तर काही गैर असेल तर चौकशी करून कारवाई केली जाईल अशी माहिती दिली. वाचा - मोठी बातमी! मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणात 15 वर्षांनी भारताला मोठं यश स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये नवी मुंबई राज्यात पहिलं “स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2022” मध्ये नवी मुंबई शहरास देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्यात नेहमीप्रमाणेच नवी मुंबई नंबर वनचे स्वच्छ शहर आहे. नवी दिल्ली येथील तालकोटरा स्टेडियम येथे आयोजित ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ भव्य समारंभात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने माजी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा सन्मान स्विकारला.