मुंबई, 11 जुलै: पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीविरोधात महाराष्ट्र काँग्रेसतर्फे राज्यभरात आंदोलन केलं जात आहे. शनिवारी मुंबईत देखील काँग्रेस (Congress) नेत्यांनी बैलगाडीतून मोर्चा काढला. मात्र या आंदोलनादरम्यान एक विचित्र घटना घडली. आंदोलनावेळी काँग्रेस नेत्यांबरोबर काही कार्यकर्ते देखील बैलगाडीत चढले होते. मात्र बैलगाडीवर भार पडल्यानं ती कोसळली आणि बैलगाडीतील कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस नेतेही जमिनीवर कोसळले. या घटनेमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) बैलगाडीवरुन जमिनीवर कोसळले. या घटनेनंतर भाजप (Bjp) नं काँग्रेसवर आणि भाई जगताप यांच्यावर निशाणा साधत टोला लगावला. भाजप नेत्यांनी शेलक्या शब्दात या आंदोलनाची खिल्ली उडवली. मात्र भाई जगताप यांनी यावर भाजपच्या नेत्यांना खरमरीत प्रत्युत्तर दिलं आहे. आंदोलनादरम्यान बैलगाडी मोडून जमिनीवर कोसळल्यानंतर हसणाऱ्या भाजपच्या नेत्यांना भाई जगताप यांनी खडेबोड सुनावलेत. ट्विट करुन भाई जगताप म्हणाले की, माझ्या पडण्याच्या व्हिडिओसाठी इतके उत्सुक असलेले सर्व भाजप नेते, जर ते देशाची अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य सेवेसाठी तितकेच उत्सुक असते तर! आज देशाची स्थिती अशी झाली नसती…
काय म्हणाले होते भाजप नेते या घटनेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. तुम्ही काँग्रेसच्या आंदोलनाचा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकला तर लक्षात येईल की आंदोलनादरम्यान नेते देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो, अशा घोषणा देत होते. कदाचित राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलानांही आवडलेलं नसावं. त्यामुळे ती बैलगाडी मोडली, असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला होता.
‘गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा’ नकार! माननीय भाई जगताप तुम्हाला सांगू इच्छितो की, “माणसाने झेपेल तेवढंचं करावं!” असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा!, अशी बोचरी टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली होती.