मुंबई, 30 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा (Shah Rukh Khan) आर्यन खान (Aryan Khan) अखेर तुरुंगाबाहेर आला आहे. 26 दिवसांनंतर आर्यन तुरुंगाबाहेर आला. 2 ऑक्टोबरला एनसीबीनं मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीवर टाकलेल्या छाप्यात आर्यन खानला अटक करण्यात आली होती. गुरुवारी आर्यन खानला मुंबई (Mumbai High Court) हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यानंतर काल त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पडली. मात्र जामिनाची प्रत तुरुंगात वेळेवर पोहोचली नसल्यानं आर्यनला रात्र तुरुंगात काढावी लागली. आज पहाटे 5.30 वाजता आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून जामीन पत्रपेटी उघडण्यात आली.
आर्यन खानच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर आर्थर रोड तुरुंगाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली.
शाहरुख खान यावेळी वरळीतल्या एका हॉटेलमध्ये थांबला होता. यावेळी त्याच्यासोबत गौरी खानही उपस्थित होती. तर शाहरुख खाननं गाडीमध्येच नाश्ता केल्याची माहिती समोर आली. जुही चावला जामीनदार
गुरुवारी संध्याकाळी जवळपास साडेचार वाजेच्या सुमारास अभिनेत्री जुही चावला आर्यनच्या जामीनासाठी जामीनदार म्हणून सेशन कोर्टात पोहोचली. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे देखील कोर्टात दाखल झाले होते. मानेशिंदे यांनी कोर्टात न्यायाधीशांकडे जामीनाचे कागदपत्रे सादर केले. यावेळी जुही चावला जामीनदार म्हणून कोर्टात हजर झाली.
कोर्टात जुही चावलानं आपलं आधारकार्ड आणि पासपोर्ट सादर केलं. जुहीने औपचारिकपणे आपला परिचय कोर्टात दिला. मात्र यावेळी जुहीचा एक पासपोर्ट फोटो कमी पडला. त्यामुळे जामीनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यास उशीर झाला. आर्यनला 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन दरम्यान, मुंबई हायकोर्टाने आर्यन खानला अटी शर्तीसह जामीन मंजूर केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोर्टात जोरदार युक्तीवाद सुरू होता. अखेरीस आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी जमेची बाजू लावून धरत आर्यन खानला जामीन मिळवून दिला.आता आर्यनसही तिघांची जामिनीवर सुटका होणार आहे. जामीन अर्जामध्ये अनेक अटींची आर्यनला पालन करावे लागणार आहे. हेही वाचा- RBI ने या बँक खात्यासंदर्भातील नियमात केले बदल, कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
एकूण 5 पानांची ॲार्डर आहे. 1 लाख रुपयांचा जातमुचलक्यावर प्रत्येकी जामीन मंजूर करण्यात आला आहे. असा गुन्हा परत करू नये, इतर आरोपींशी बोलू नये, साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये, देश सोडू नये, मीडियाची, सोशल मीडियावर बोलू नये असे नियम घालण्यात आले आहे. त्याचबरोबर ncb ऑफिसमध्ये प्रत्येक शुक्रवारी 11 ते 2 वेळात हजर राहावे लागणार आहे.