आदित्य ठाकरेंच्या गाडीला सेनाभवनजवळ अपघात
मुंबई, 28 जून : आदित्य ठाकरे यांच्या गाडीला बाईकस्वाराने धडक दिली आहे. आदित्य ठाकरे शिवसेना भवनमध्ये येत असताना गाडीच्या मागून आलेली बाईक त्यांच्या चारचाकीला धडकली. शिवसेना भवनच्या सिग्नलच्या पुढे येऊन आदित्य ठाकरे शिवसेना भवनच्या उजव्या बाजूला वळण घेत होते, तेव्हा अचानक वेगाने आलेल्या बाईकने पुढच्या चाकाजवळ धडक दिली. आदित्य ठाकरे शिवसेना भवनमध्ये आले त्यावेळी त्यांनी शाखाप्रमुखांना त्या बाईकस्वाराची विचारपूस करायला सांगितली. तसंच धडक दिल्यानंतर ट्रॅफिक पोलीस, पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी या बाईकस्वाराला बाजूला घेतलं. काहीच दिवसांपूर्वी ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा कमी करण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, पण मुंबई पोलिसांनी मात्र ठाकरे कुटुंबाची सुरक्षा व्यवस्था कमी करण्यात आलेली नाही, असं स्पष्ट केलं होतं.
2018 साली राज्य गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती आणि त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. त्याआधी ठाकरे कुटुंबाला झेड सुरक्षा होती. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना बुलेटप्रुफ स्कॉर्पियो कार, मुंबई पोलिसांमधला एक अधिकारी आणि चार कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले होते, अशी माहिती मुंबई पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी बाळसिंग रजपूत यांनी दिली आहे.