राजेश भागवत (प्रतिनिधी) जळगाव, 25 जानेवारी: आतापर्यंत मोठंच्या मोठं पोलट्री फार्म तुम्ही पाहिलं असेल. पण आता आम्ही तुम्हाला असं एक तरंगतं पोलट्री फार्मबाबत सांगणार आहोत. जे अख्या महाराष्ट्रात मोठ्या कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय झाला आहे. हे फार्म उभारलं गेलंय एका शेततळ्यावर. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र जळगावातल्या एका शेतकऱ्यानं आपल्या शेततळ्यामध्ये हा यशस्वी प्रयोग केला आहे. जळगावातल्या पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रूक इथे राहाणारे शेतकरी शांताराम काळे यांनी आपल्या शेततळ्यातच तरंगतं शेड उभारलं आहे. ह्यात शेततळ्यामध्ये मत्स्यउत्पादनही ते घेत आहेत. शेतीपुरक उद्योगांच्या माध्यामातून ते वर्षाकाठी दोन लाख रुपयांचा नफाही घेत आहेत. शांताराम काळे यांचं दोनशे फूट लांब आणि 100 फूट रुंदीचं शेततळं आहे. त्यासाठी त्यांना 5 लाखांचा खर्च आला. आता त्याच शेततळ्यातल्या पाण्याचा वापर कसा करता येईल याच विचारातून त्यांनी शेततळ्यामध्ये 20 हजार मत्स्यबीज सोडले. तर तिसऱ्या प्रकल्पासाठी त्यांनी त्याच शेततळ्यावर तरंगणारं कुक्कुटपालनाचं शेडही उभारलं. ज्यासाठी त्यांना 50 हजारांचा खर्च आला. दोरीच्या सहाय्यानं हे तरंगतं शेड फिरतं ठेवता येतं. सोबतच माशांच्या खाद्यासाठी कोंबडीच्या मलमूत्राचा आणि भरडा, तांदळाचाही उपयोग होतो. त्यामुळे ह्या उद्योगासाठी त्यांना भांडवलाचा खर्चही कमी आला.
एकीकडे शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी बनवल्या गेलेल्या शेततळ्याचा असा विविधांगी वापर करून शांताराम काळे यांनी जोडधंदा सुरू केला आहे. ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आणि त्यांच्या जवळ उपलब्ध असणाऱ्या साधनसामुग्रीचाही पुरेपूर वापर होत आहे. शांताराम काळेंच्या अशाच कल्पकतेनं सुरू केलेल्या उद्योगांचा तुम्हीही थोडा विचार केलात, तर तुम्हालाही कल्पनेच्या जोरावर अधिक नफ्यातला व्यवसाय करणं सहज शक्य होईल.