JOIN US
मराठी बातम्या / मनी / रशिया-युक्रेन युद्धाचा नाशिकच्या द्राक्ष निर्यातीला मोठा फटका; शेतकऱ्यांना कवडीमोलाने विकावी लागत आहेत द्राक्षं

रशिया-युक्रेन युद्धाचा नाशिकच्या द्राक्ष निर्यातीला मोठा फटका; शेतकऱ्यांना कवडीमोलाने विकावी लागत आहेत द्राक्षं

नाशिकमधून दर वर्षी रशिया, युक्रेन तसंच युरोपीय देशांना 24 ते 25 हजार मेट्रिक टन द्राक्षं निर्यात केली जातात; पण रशिया आणि युक्रेनमधल्या युद्धामुळे ही निर्यात 14 ते 15 हजार मेट्रिक टन इतकी कमी झाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 21 मार्च : रशिया-युक्रेन युद्धाचे (Russia -Ukraine War) परिणाम आता जगभरात जाणवू लागले आहेत. इंधन दरवाढीसह अनेक व्यापार आणि निर्यात व्यवसायावर परिणाम होत असून, आपल्या देशातही याचे चटके बसू लागले आहेत. देशातल्या, विशेषत: महाराष्ट्रातल्या (Maharashtra) द्राक्ष निर्यातीला (Grapes Export) मोठा फटका बसला आहे. निर्यात कमी झाल्यानं द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधल्या (Nashik) द्राक्ष व्यापाऱ्यांना कवडीमोलाने म्हणजे अगदी 10 ते 20 रुपये किलो दराने स्थानिक बाजारपेठेत द्राक्षं विकावी लागत आहेत. ‘सीएनबीसी टीव्ही 18’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. द्राक्ष निर्यातीचा हंगाम सुरू असतानाच रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालं असल्यानं या देशांसह युरोपियन देशांना (Europian Countries) होणाऱ्या द्राक्ष निर्यातीवरही परिणाम झाला आहे. फेब्रुवारीच्या मध्यापासून द्राक्षाचा हंगाम सूरू होतो. मार्च महिन्यापासून त्यात आणखी वाढ होते. या हंगामात देशातून सुमारे 3 हजार कंटेनर द्राक्षाची निर्यात होत असते. यंदा मात्र या युद्धामुळे जहाज वाहतुकीवर परिणाम झाल्यानं, तसंच आर्थिक नुकसानाच्या भीतीनं निर्यात करणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांनी, कंपन्यांनी द्राक्षाची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. निर्यात करण्यासाठी पिकवलेली उच्च दर्जाची द्राक्षं 70 ते 75 रुपये किलो दराने विकली जातात, तीच आता स्थानिक बाजारपेठेत (Local Market) केवळ 10 ते 20 रुपये दराने विकावी लागत आहेत. यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याचं नाशिकमधले द्राक्ष व्यापारी अशोक रायते यांनी सांगितलं. ‘रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्यात होत नसल्यानं ही द्राक्ष बांगलादेशला (Bangladesh) पाठवण्यात येणार होती; पण अवकाळी पावसामुळे (Rain) तेही शक्य झालं नाही. आता नवीन पिकासाठी बागा तयार करायच्या असल्यानं तयार द्राक्षं लवकरात लवकर विकून बागा मोकळ्या करणं आवश्यक आहे. त्यामुळे नाईलाजानं शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसून मिळेल त्या भावात ही द्राक्षं विकावी लागत असल्याचं रायते यांनी स्पष्ट केलं. नाशिकमधून दर वर्षी रशिया, युक्रेन तसंच युरोपीय देशांना 24 ते 25 हजार मेट्रिक टन द्राक्षं निर्यात केली जातात; पण रशिया आणि युक्रेनमधल्या युद्धामुळे ही निर्यात 14 ते 15 हजार मेट्रिक टन इतकी कमी झाली आहे. त्यामुळे 8 ते 9 हजार मेट्रिक टन द्राक्षं पडून आहेत. निर्यात होणाऱ्या द्राक्षांना 70 ते 75 रुपये किलो असा दर मिळतो; पण आता ती किलोमागे 50 ते 60 रुपये नुकसान सोसून विकावी लागत आहेत. नाशिकमधून युक्रेनला दर वर्षी 2500 मेट्रिक टन ते 3 हजार मेट्रिक टन इतकी द्राक्षं निर्यात होतात. ते प्रमाण आता 800 ते 1000 मेट्रिक टनांवर आलं आहे. त्यामुळे या उर्वरित 1000 ते 1700 मेट्रिक टन द्राक्षांची विक्री कशी करायची असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. हा फार मोठा फटका असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. लवकरात लवकर द्राक्षं विकली जाणं गरजेचं असल्यानं शेतकऱ्यांसमोर मिळेल त्या दराने विक्री करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे वायनरीजही कमी दरात द्राक्ष खरेदी करत आहेत. त्यांच्याशी व्यवहार करताना आपल्याला हवा असलेला दर मागणं आता शेतकऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे नाशिकमधले द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले असून, युद्ध लवकरात लवकर संपावं आणि किमान पुढील हंगाम तरी सुरळीत पार पडावा अशी त्यांची अपेक्षा आहे. रशिया-युक्रेन युद्धाचे दूरगामी परिणाम आता जाणवू लागले असून, आगामी काळात काय होईल, याची चिंता आता सर्वांनाच भेडसावू लागली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या