बंगळुरु, 27 जून : IKEA फर्निचर स्टोअर बंगळुरुतील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वीडिश फर्निचर रिटेलर IKEA ने 22 जून रोजी बंगळुरूमध्ये आपले नवीन स्टोअर सुरु केले. यावेळी या स्टोअरमधून शॉपिंगसाठी हजारो लोकांची रांग दिसली. बंगळुरुच्या नागासंद्र परिसरात असलेल्या या स्टोअरमध्ये लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि सुरक्षा रक्षकांना गर्दीवर नियंत्रण ठेवणे देखील कठीण झाले होते. शनिवारी संध्याकाळी 6 वाजता, गर्दी इतकी होती की स्टोअरने ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. IKEA Store ने ट्विटरवर लिहिले की, बंगळुरु आम्ही तुमच्या प्रतिसादाने थक्क झालो आहोत. नागासंद्र स्टोअरमध्ये वेटिंग टाईम तीन तास आहे. कृपया तुमच्या वेळेचं नियोजन करा किंवा ऑनलाइन खरेदी करा. Ikea च्या बंगळुरू स्टोअरमधील गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. IKEA स्टोअरमधील या गर्दीचे मीम्स आता सोशल मीडियावरही शेअर केले जात आहेत. यावरही अनेक जोक्स सुरू आहेत. प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “महाराष्ट्रातील सरकार स्थापनेसाठीची आमदारांची ही रांग नाही. आपल्या देशात येण्यासाठी इमिग्रेशन काउंटरवरची ही रांग नाही. कोविड लसीकरणाची ही रांग नाही. तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी जमलेली ही गर्दी नाही. तर बंगळुरूमध्ये Ikea स्टोअर उघडल्यानंतरचे हे दृश्य आहे.”
एका ट्विटर यूजरने बंगळुरु IKEA स्टोअरची तुलना तिरुपती बालाजी मंदिराशी केली. अखेर तिरुपती बालाजी मंदिराला कॉम्पिटिशन मिळालं, असं त्या यूजरने म्हटलं.
IKEA नागासंद्र स्टोअर 4.6 लाख स्क्वेअर फूट पसरलेलं असून 7,000 हून अधिक होम फर्निशिंग प्रोडक्ट्स येथे उपलब्ध आहेत. बंगळुरूमधील नागासंद्र स्टोअर हे IKEA चे भारतातील चौथे स्टोअर आहे. इतर तीन IKEA स्टोअर्स हैदराबाद, नवी मुंबई आणि वरळी सिटी स्टोअर येथे आहेत.
कर्नाटकात 3,000 कोटींच्या नियोजित गुंतवणुकीसह IKEA यावर्षी बंगळुरूमध्ये जवळपास 50 लाख नागरिकांना आकर्षित करेल, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन स्टोअर हे शहरातील एक लँडमार्क असेल, जे कुटुंबाच्या विविध गरजा पूर्ण करणारी होम फर्निशिंग सोल्यूशन्स प्रोव्हडर असेल.