मुंबई, 19 फेब्रुवारी : मार्च-एप्रिलमध्ये किंवा त्यानंतर पगारवाढ होणार म्हणून डोळे लावून बसलेल्या नोकरदारांसाठी एक वाईट बातमी आहे. या वेळी पगारवाढीची अपेक्षा फार ठेवण्यात अर्थ नाही. नुकत्याच हाती आलेल्या सर्वेक्षणानुसार, या वर्षी भारतात गेल्या दशकातली सर्वांत कमी पगारवाढ होऊ शकते. एऑन सॅलरी इन्क्रीज सर्व्हे 2020 नुसार यावर्षीची जास्तीत जास्त पगारवाढ 9.1 टक्के एवढीच असेल. 2009 मधल्या मंदीनंतरची ही सर्वांत कमी वाढ ठरण्याची शक्यता आहे. Aon ने केलेल्या सर्व्हेमध्ये 1000 हून जास्त कंपन्यांकडून माहिती गोळा करण्यात आली. या डेटाच्या आधारे त्यांनी बांधलेल्या अंदाजात सर्वच क्षेत्रातील कंपन्या फार मोठी पगारवाढ देण्याच्या परिस्थितीत नाहीत. 20 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्यांचा अभ्यास केल्यानंतर यावर्षी पगारवाढ फार देण्याची शक्यता नसल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. ई कॉमर्स आणि नवे उद्योग यांच्याकडून यावर्षी सर्वाधिक अपेक्षा ठेवता येईल. जास्तीत जास्त 10 टक्के पगारवाढ या क्षेत्रात मिळू शकते. सर्वांत कमी पगारवाढ वाहतूक क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. हॉस्पिटॅलिटी, रेस्टॉरंट्स या क्षेत्रातल्या नोकरदारांनाही फार कमी पगारवाढ मिळू शकते. भारतीयांसाठी आकर्षक पगारांचं क्षेत्र ठरलेल्या आयटी क्षेत्रात या वर्षी फार मोठी पगारवाढ मिळणार नाही. 9.5 टक्क्याच्या आसपास जास्तीत जास्त पगारवाढ होऊ शकते. ऑटोमोबाइल, टेलिकम्युनिकेशन, इंजीनिअरिंग, रिअल इस्टेट, माध्यम सेवा आदी क्षेत्रातही फार मोठी पगारवाढ मिळणार नाही.
गेल्या वर्षी सर्वसाधारणपणे 9.3 टक्के एवढी पगारवाढ मिळाली होती. एशिया पॅसिफिक क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्या तरीही वरच्या स्थानावर राहिल्या. कारण या क्षेत्रातल्या इतर देशातल्या कंपन्यांनी याहूनही कमी पगारवाढ केली होती. यावर्षीही चित्र फारसं आशादायक नसल्याचं स्पष्ट होत आहे.