मुंबई, 17 ऑक्टोबर : सणासुदीचा हंगाम चालू आहे आणि या दिवसात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. घर सजवण्यासाठी, सण साजरे करण्यासाठी, मित्र आणि नातेवाईकांसाठी भेटवस्तू देण्यासाठी, जोरदारपणे खरेदी केली जाते. मात्र, खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्या. विशेषतः जर क्रेडिट कार्डद्वारे (Credit Card) खरेदी केली जात असेल, तर ते वापरताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा उत्साहाने केलेली खरेदी आनंद कमी आणि मनस्ताप जास्त देते. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घ्यावी हे जाणून घ्या. पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने क्रेडिट कार्ड हे एक फायदेशीर आर्थिक साधन आहे. गरजेच्या वेळी ते आधार देते. आर्थिक अडचण जाणवल्यास आपल्याला कोणाकडे कर्ज मागायची वेळ येत नाही. अल्प कालावधीसाठी पैशाची गरज सहजपणे क्रेडिट कार्डद्वारे पूर्ण होते. क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरल्यास बोनस पॉइंट्सदेखील मिळतात आणि तुमचा क्रेडिट स्कोअर देखील सुधारतो. म्हणून, क्रेडिट कार्डाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी, त्याचा वापर सुज्ञपणे करणे गरजेचे आहे. वेळेवर बिल भरा (Credit Card Bill Payment) क्रेडिट कार्ड वापरल्यास त्याची बिले निर्धारित वेळेत भरली पाहिजेत. यातच शहाणपण आहे. पेमेंटमध्ये विलंब झाल्यास जास्त व्याज दर द्यावा लागतो. क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर राखण्यास मदत होते. बिलिंग सायकलच्या सुरवातीलाच खरेदी करा (Credit Card Shopping) क्रेडिट कार्डला एक बिलिंग सायकल असते. कार्डवर खरेदी केलेल्या वस्तूंचं बिल महिन्यात एकदा तयार होतं त्याला बिल डेट म्हणतात त्यानंतर साधारण 15 दिवसांनी ते बिल भरावं लागतं. या महिन्याच्या बिलाच्या तारखेपासून पुढच्या महिन्याच्या बिलाच्या तारखेपर्यंतच्या काळाला बिलिंग सायकल म्हणतात. त्यामुळे बिल निघाल्यानंतर दुसऱ्यादिवशी खरेदी केली तर सर्वाधिक वेळ पैसे वापरायला मिळतात त्यामुळे सुरुवातीलाच खरेदी करा. क्रेडिट कार्डने खरेदी करताना कार्ड स्टेटमेंट तपासावीत आणि आपल्या देय क्षमतेनुसार खर्च करावा. स्टेटमेंट वेळोवेळी तपासले पाहिजेत. यामध्ये रिवॉर्ड पॉइंट्स सारख्या फायद्यांची माहिती मिळत राहते. असे केल्यास तुम्ही क्रेडिट कार्डचा अधिक लाभ घेऊ शकतो. क्रेडिट कार्ड स्टेटमेंट (credit card statement) क्रेडिट कार्ड स्टेटमेंट हे एक विशिष्ट बिलिंग सायकलमध्ये तुमच्या क्रेडिट कार्डशी संबंधित सर्व व्यवहारांचं बिल असतं. यात तुमच्या कार्डाशी संबंधित सर्व माहिती असते. जसे एकूण देण्याची रक्कम, सर्वात कमी पेमेंट रक्कम, रक्कम भरण्याची शेवटची तारीख, क्रेडिट मर्यादा, तुम्ही कमावलेले रिवॉर्ड पॉइंट्स, रिडीम न केलेले पॉइंट्स ही माहिती असते. क्रेडिट कार्डचे फायदे (Benefits of Credit Card) क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यानंतर रिवॉर्ड पॉइंट मिळतात. 50 दिवसांच्या आत बिले भरल्यास कोणतेही व्याज भरण्याची गरज पडत नाही. तसेच गरज पडल्यास रोख रक्कम कर्ज म्हणून घेता येते. क्रेडिट मर्यादा निवडताना खबरदारी (Credit Card Limit) क्रेडिट कार्डावर मर्यादा असणं म्हणजे तुम्हाला बँकेकडून निश्चित करण्यात आलेली ठराविक रक्कम खर्च करता येते. क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना, क्रेडिट कार्ड मर्यादा निवडताना काळजी घेतली पाहिजे. तुमचे उत्पन्न, बिल भरण्याची तारीख आणि खर्च लक्षात घेऊन मर्यादा निश्चित केली पाहिजे. त्यामुळे नीट वापरलं तर क्रेडिट कार्ड फायद्याचं आहे पण निश्चित तारखेपेक्षा उशिरा पैसे भरले तर जबरदस्त व्याज बँका लावतात आणि भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे सावधपणे क्रेडिट कार्ड वापरायला हवं.