मुंबई, 22 जुलै : रस्ते अपघातांचं प्रमाण अलीकडच्या काळात वाढलं आहे. बऱ्याचदा मानवी चुका हे त्यामागचं कारण असतं. मानवी चुका कमीत कमी होण्यासाठी आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास ड्रायव्हरला आणि प्रवाशांना मदत मिळावी, या उद्देशाने वाहनांमध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग दिवसेंदिवस वाढवला जात आहे. गेल्या काही काळात यात मोठी प्रगती झाली आहे. सध्या ADAS अर्थात अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीमचा बराच बोलबाला होत आहे. नव्याने बाजारात येणाऱ्या अनेक कार्समध्ये हे फीचर असतं. हे फीचर म्हणजे नेमकं काय, त्याचा उपयोग काय आणि ही सिस्टीम असलेल्या भारतातल्या पाच सर्वांत स्वस्त कार्स कोणत्या याबद्दल माहिती घेऊ या. 1. ADAS म्हणजे अशा सेफ्टी फीचर्सचा एक समूह आहे, जी ड्रायव्हरला प्रवासात आलेल्या कोणत्याही समस्येशी चांगल्या प्रकारे दोन हात करायला मदत करतात. ड्रायव्हर्स आणि प्रवाशांना यामुळे अधिक सुरक्षितता प्राप्त होते. त्यात सेफ्टी सूट अॅडाप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, ऑटोमेटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन या फीचर्सचा समावेश असतो. 2. किया इंडिया कंपनीने भारतीय बाजारपेठेतल्या सेल्टोस या आपल्या लोकप्रिय एसयूव्हीचं फेसलिफ्ट व्हर्जन अलीकडेच सादर केलं आहेत. त्यात अन्य बदलांसह ADAS चा समावेश हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. भारतात ADAS असलेल्या सर्वांत किफायतशीर पाच कार्स कोणत्या, याची माहिती घेऊ या. 3. ह्युंडाई वेर्ना ADAS असलेली वेर्ना ही होंडा सिटीनंतरची दुसरी मिड साइज सेडान कार आहे. ह्युंदाई स्मार्टसेन्स या नावाने ओळखला जाणारा सुरक्षा सूट उपलब्ध आहे. एक्स शो-रूम किंमत 14.65 लाख रुपयांपासून सुरू होते. त्यात फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट कोलिजन वॉर्निंग, लेन कीपिंग असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, स्टॉप अँड गो, स्मार्ट क्रूझ कंट्रोल, लेन फॉलोइंग असिस्ट आदी फीचर्सचा समावेश आहे. 4. किया सेल्टोस अलीकडेच सादर झालेल्या सुधारित किया सेल्टोसमध्ये 17 ऑटोनॉमस ADAS फीचर्स मिळतात. 2023च्या किया सेल्टोस फेसलिफ्ट मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.89 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारच्या X Line व्हॅरिएंटमध्येच ADAS फीचर्स उपलब्ध आहेत. त्या व्हॅरिएंटची एक्स शोरूम किंमत 20 लाख रुपयांपासून सुरू होते. 5. एमजी अॅस्टर एमजी अॅस्टरच्या टॉप एंड व्हॅरिएंटमध्ये ADAS सूटसह अॅडाप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आदी फीचर्सचा समावेश आहे. त्या व्हॅरिएंटची प्रारंभिक एक्स शोरूम किंमत 16,99,800 रुपयांपासून सुरू होते. या एसयूव्ही कारच्या डॅशबोर्डवर एक पर्सनल AI असिस्टंट रोबोटही असतो. तो वेगवेगळ्या विषयांची माहिती देऊ शकतो. शार्प व्हॅरिएंटमध्येही ऑटोनॉमस लेव्हल टूच्या फीचर्ससाठी ADAS पॅकेज निवडण्याचा पर्याय आहे. 6. होंडा सिटी हायब्रिड कॅमेरावर आधारित ADAS सूट असलेली होंडा सिटी हायब्रिड ही पहिली कार. त्या कारची किंमत 18,89,000 रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये ADAS सूटला होंडा सेन्सिंग असं म्हटलं जातं. त्यात लेन कीप असिस्ट, कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग, रोड डिपार्चर मिटिगेशन, अॅडाप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटो हेडलॅम्प बीम अॅडजस्ट आदी फीचर्सचा समावेश आहे. फेसलिफ्टनंतर V, VX, ZX या पेट्रोल व्हॅरिएंटमध्येही ADAS फीचर उपलब्ध आहे. होंडा सिटीच्या पाचव्या जनरेशनमधल्या बेस व्हॅरिएंटची किंमत 11,57,000 रुपयांपासून सुरू होते. V व्हॅरिएंटपासून ADAS फीचर्स उपलब्ध आहेत. त्या व्हॅरिएंटची किंमत 12.45 लाख रुपयांपासून सुरू होते. 7. टाटा हॅरियर टाटा हॅरियरची किंमत 15 ते 24 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. या कारच्या अपडेटेड मॉडेलमध्ये ADAS चा समावेश करण्यात आला. त्यात फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग, ट्रॅफिक साइन रेकग्निशन, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन चेंज अलर्ट, हाय बीम असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, रिअर कोलिजन वॉर्निंग अशा फीचर्सचा समावेश आहे. या एसयूव्हीमध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ऑल व्हील डिस्क ब्रेक अशा आणखीही काही सेफ्टी फीचर्सचा समावेश आहे.