आपण एखादे पंक्चरचे दुकानात पाहिले तर आजूबाजूला बरेच खराब टायर आणि ट्यूब पडलेले दिसतील. दुकानदार एक तर ते फेकून देतात किंवा दुकानाच्या कुठल्यातरी कोपऱ्यावर ढिगारा लावून ठेवतात. पण वर्ध्यातील पंक्चर दुकानदाराने यापासून आकर्षक अशा कलाकृती बनवल्या आहेत. एखाद्या सामान्य माणसाने सामाजिक जाण ठेवून मनावर घेतले तर तो शासकीय उपक्रम उत्तम प्रकारे राबवू शकतो आणि पाहता पाहता तो समाजाच्या कौतुकाचा आणि आदर्शाचा विषय होऊ शकतो. याचा प्रत्यय कारंजा बस स्थानक परिसरात टायर पंक्चर दुरुस्तीचे काम करणाऱ्या मोहम्मद दाबिर शेख यांच्या बाबतीत आला. आपल्या कल्पकतेने टाकाऊ टायर पासून विविध आकाराच्या रोपांच्या कुड्या, कचराकुंड्या, प्राणी, गाड्यांच्या कलाकृती बनवून ते स्वच्छतेचा आणि वृक्षारोपन अभियानाला प्रोत्साहन देत आहेत. त्यांनी बनविलेल्या कुंड्या नागरिकांना आकर्षक करीत आहेत.आपल्या या पारंपरिक व्यवसायातून वाया जाणाऱ्या टायर, ट्यूब पासून शासकीय उपक्रमाला हातभार लावण्याचा प्रयत्न दाबिर शेख यांनी केला आहे. टाकाऊ टायर ट्यूबच्या तुकड्यापासून कचराकुंड्या व झाडे लावण्यासाठी वृक्षरोप कुंड्या तयार करण्याची संकल्पना दाबिर यांना सुचली. ‘त्यांनी वाया गेलेल्या टायर पासून बदक, बगळा, मोर, हत्ती, कासव, कावळा, चिमणी, कमळ यासह सायकलच्या आकाराच्या आकर्षक कचराकुंड्या व वृक्ष कुंड्या बनवलेल्या आहेत. या सर्व कुंड्यांना विविध रंग देऊन त्यात झाडे लावली आहेत. जवळपास दीडशेच्या वर असलेल्या कलाकृती दुकानदाराच्या बाजूला सुंदर अशी मांडणी करुन लावण्यात आल्या आहेत. या कुंड्या अनेकांच्या नजरेत भरत असून त्या पाहण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. त्यामुळे रस्त्याने येणारे जाणारे या कुंड्यांची खरेदी करीत आहे. त्यामुळे दाबिर शेख यांच्या कल्पनेतुन हा प्रस्ताव मिळण्या सोबत त्यांना वेगळा रोजगार मिळाला आहे. तसेच त्यांच्या छंद जोपासला जात असल्याचे त्यांना वेगळे समाधान मिळत आहे. मोहम्मद दाबिर शेख यांच्याशी संपर्क साधून (7721873167) आपण देखील येथील वस्तू खरेदी करूं शकतात किंवा कोणत्याही प्राण्यांची प्रतिकृती तयार करुन घेवू शकतात.