चंद्रपूर, 20 फेब्रुवारी : गाडी वेगावर नियंत्रण ठेवा नाहीतर जीवाशी मुकाल अशा कितीही सुचना दिल्या तरी गाड्यांचा वेग काही कमी होत नाही. चंद्रपूरमध्ये भरधाव वेगात असणाऱ्या एका कारला भीषण अपघाता झाला आहे. या अपघातामध्ये तब्बल 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. चंद्रपूरमधील मूल तालुक्यातील केसलाघाट इथे हा भीषण अपघात झाला आहे. कारचा भरधाव वेगात असल्यामुळे चालकाला कंट्रोल करताना आली नाही. त्यामुळे अपघात झाला. यामध्ये 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 7 जण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेली स्कॉर्पिओ गाडी मार्गावर नादुरुस्त उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. गाडीचा वेग इतका होता की यामध्ये निम्मी कार ही ट्रकखाली शिरली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया इथे देवदर्शनाला गेले असता परत येत असताना चंद्रपूर इथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. मृतांमध्ये सर्वजण हे चंद्रपूरला राहणारे असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या अपघातामध्ये मृत झालेल्यांपैकी एक दीड वर्षाचा मुलगा आहे. मृतांमध्ये 2 पुरुष 3 महिला आणि एक लहान मुलगा आहे. मृतकांमध्ये ६ जणांचा समावेश असून त्यांची नावे खालील प्रमाणे आहे… संभाजी भोयर (77) कुसुम भोयर (65) जियान भोयर (दीड वर्ष) दत्तू झोडे (45) मीनाक्षी झोडे (35) शशिकला वांढरे (65) तर जितेंद्र मारोती पटपेल्लीवार (30), मनिषा भोयर (32), अंकिता पेटकुले (10), क्रिश पाटील (10), सोनी पाटील (8), शिला पाटील (36) आणि रेखा खाटेकर (60) अशी जखमींची नावं असून सर्व चंद्रपूर इथले रहिवासी आहे. सर्व ७ जखमींना मूल ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनास्थळावरून 6 मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. एकाच वेळी कुटुंबातील लोकांना गमावल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.