अकोला 23 जून: विदर्भातलं मोठं शहर असलेल्या अकोल्यात आज भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.3 एवढी नोंदविण्यात आली आहे. अकोल्यापासून दक्षिणेला 129 किलोमीटर अंतरावर त्याचं केंद्र होतं अशी माहिती देण्यात आली आहे. या भूकंपेमुळे लोकांना कंपने जाणवली. त्यामुळे काही ठिकाणी लोक घराबाहेरही आले होते. मात्र हे धक्के हलक्या स्वरुपाचे असल्याने कुठलीही वित्त किंवा जिवित हानी झाली नाही. गेल्या काही दिवसांपासून देशात अनेक ठिकाणी भूंपाचे धक्के बसत आहेत. दिल्लीत तर दोन महिन्यांमध्ये तब्बल 12 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले तर काही दिवसांपूर्वी मुंबईजवळही भूकंपाचे धक्के जाणवले होते.
महाराष्ट्रात काही भागात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने शास्त्रज्ञांनी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात कोयना परिसरात दरवर्षी काही भूकंपाचे धक्के जाणवत असतात. मात्र त्याची तीव्रता अतिशय कमी असते. बहुतांश वेळा त्या धक्क्यांची फक्त मशिन्सवरच नोंद होते. त्यामुळे ते जाणवतही नाहीत. संपादन - अजय कौटिकवार