वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्ट गेल्यामुळे आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
मुंबई, 14 सप्टेंबर : वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा प्रोजेक्ट महाराष्ट्राऐवजी गुजरातला गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सरकारने हा प्रकल्प गुजरातला जायला तत्कालिन महाविकासआघाडी सरकार जबाबदार असल्याचं सांगितलं, तर आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर आरोप केले. या मुद्यावरून आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘काल वेदांता फॉक्सकॉन कंपनी बाहेर गेल्यामुळे धक्का बसला. अद्यापही सरकारकडून उत्तर दिलं गेलं नाही. 22 जानेवारी 2022 ला आम्ही बैठक घेऊन पाठपुरावा केला होता. 40 गद्दारांनी सरकार पाडले आणि हे राहिलं. 1 लाख रोजगार गेले याची जबाबदारी कोण घेणार. हा प्रकल्प कसा गेला, याचं उत्तर अद्याप आलं नाही,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले. ‘मुख्यमंत्री मंडळांना भेट देत आहेत, त्यांना अनेक प्रकल्पांबाबत माहिती नाही. उद्योग मंत्र्यांनी यावर उत्तर द्यावं. 2 लाख कोटींचा प्रोजेक्ट बाहेर जातोच कसा? आम्ही प्रकल्प खेचून आणले होते, यांनी ते पळवून लावले. केंद्र सरकारबरोबर सांगड घालून 80 हजार कोटी डावस मधून आणले होते,’ असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. ‘एअर बसचा मोठा प्रकल्प आहे, त्याचा पाठपुरावा लवकर करा, कारण नवरात्र येत आहे. तुम्हाला मंडळांना भेटायला जायचं आहे, परत वेळ मिळणार नाही. मुख्यमंत्री गणपती मंडळात फिरत होते, आता गरबा येईल तेव्हा ते गरागरा फिरतील, त्यांनी जरा कामावर लक्ष द्यावं,’ असा टोलाही आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना लगावला. ‘बल्क पार्कदेखील गुजरातला जात आहे. मुख्यमंत्री वेगवेगळ्या मंडळांना भेटत होते, पण याचे उत्तर दिलं नाही. मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प आपल्या राज्यात येणार, असं हाऊसमध्ये सांगितलं मग काय झालं? हा प्रकल्प रोजगार देणारा आहे, गुंतवणूक देणारा आहे, मग हा प्रकल्प तुम्ही जाऊच कसे देता? आपण जो बल्क पार्कचा प्रस्ताव दिा तो सुद्धा निघून जातो, पण व्यवस्थेने हा पळवून लावला आहे,’ असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं. ‘आमचं वेगळ्या विचारधारेचं सरकार असलं तरी केंद्र सरकारसोबत बोलणी करून पाठपुरावा करू शकतो, मग या सरकारचं नेमकं काय झालं? सुभाष देसाई उद्योगमंत्री असताना त्यांनी बैठक घेतली आणि तळेगाव कसं योग्य आहे, ते पटवून दिलं,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले. ‘दहीहंडीला खेळाचा दर्जा देऊ असं म्हणाले ते सोडून दिलं. मग इन्श्युरन्स देऊ म्हणाले तेही सोडून दिलं. हे फक्त जाहीर करतात आणि सोडून देतात. जीत के हारने वाले को खोके सरकार कहते है. आम्ही केंद्र सरकारबद्दल बोलतच नाही. केंद्र सरकारसोबत नीट चर्चा झाली असती तर झालं असतं, पण या सरकारचं लक्ष नाही, कोणाचेही नियंत्रण नाही. रोजगार निघून जात आहेत. आमच्यासोबत गद्दारी केली तशी या राज्यातील तरुणासोबत गद्दारी करू नका,’ अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. नाणारबद्दल स्थानिकांचा विरोध होता, पण वेदांता आणि बल्क ड्रग प्रकल्पाला विरोध नव्हता, मग जाऊ का दिला? या 40 जणांनी राजीनामे दिले पाहिजेत. परदेशात महिलेची डिलिव्हरी नीट झाली नाही तर तिथल्या आरोग्य प्रमुखाने राजीनामा दिला, आपल्याकडे मजा मस्ती सुरू आहे. स्वत:साठी खोके आणि लोकांना धोके. मुख्यमंत्री हाऊसमध्ये चार लाख रोजगार देणार असल्याचं सांगतात. सरकारला खंजीर खुपसता येतो, पण लोकांच्या हिताची काम करता येत नाहीत, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.