Vedanta Chairman Anil Agarwal
मुंबई, 14 सप्टेंबर : वेदांता-फॉक्सकॉनचं प्रोजेक्ट गुजरातला गेल्यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. हा प्रोजेक्ट राज्याबाहेर गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, त्यातच आता वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन सांगितलं आहे. महाराष्ट्रामध्ये कंपनी लवकरच मोठी गुंतवणूक करणार असल्याचं ट्वीट अग्रवाल यांनी केलं आहे. सोबतच त्यांनी हे प्रोजेक्ट गुजरातला का देण्यात आलं, याबाबतही स्पष्टीकरण दिलं आहे. ‘या गुंतवणुकीसाठी आम्ही जागा शोधत होतो. दोन वर्षांपूर्वी आम्ही यासाठी वैज्ञानिक आणि आर्थिक प्रक्रिया राबवायला सुरूवात केली. आमची टीम गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामीळनाडूमध्ये गेली. मागच्या 2 वर्षांमध्ये आम्ही या सगळ्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारसोबत चर्चा करत होतो. सगळ्यांकडून आम्हाला चांगला पाठिंबा मिळाला,’ असं अनिल अग्रवाल म्हणाले.
‘आम्ही गुजरातची निवड केली कारण त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या. जुलै महिन्यात आम्ही महाराष्ट्र सरकारसोबत बैठक झाली, यात त्यांनी इतर राज्यांना मागे टाकत मोठी ऑफर दिली. आम्हाला एका ठिकाणाहून सुरूवात करायची होती. व्यावसायिक आणि स्वतंत्र सल्ला मिळाल्यानंतर आम्ही गुजरातची निवड केली,’ असं अनिल अग्रवाल यांनी सांगितलं.
‘आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी कटिबद्ध आहोत. गुजरात जेव्हीमध्ये महाराष्ट्र हा आमच्या पुढच्या एकीकरणाचा भाग असेल, यातून आम्ही महाराष्ट्रामध्ये हब बनवू,’ असं आश्वासन वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी दिलं आहे.