03 मार्च: जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 369 वा बीज सोहळा आज मोठ्या आनंदात देहु मध्ये पार पडला. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी देहूनगरीमध्ये दाखल झाले होते. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म! भेदाभेद भ्रम अमंगळ|| असं म्हणत जगाला समता शांतीचा आणि विवेकाचा संदेश देणारे महान व्यक्तिमत्त्व म्हणजे संत तुकाराम. संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्याच आख्यायिकेस अनुसरून तुकाराम बीज सोहळा साजरा केला जातो. पहाटे पाच वाजता तुकाराम महाराजांच्या पादुकांना पवमान अभिषेक झाल्यानंतर, दहा वाजता तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान ठेवते. त्यानंतर वैकुंठ मंदिराला प्रदक्षिणा घालून नांदुरकीच्या वृक्षाजवळ जमलेले लाखो वारकरी एकाच वेळी पुष्पवृष्टि करतात आणि हा सोहळा पार पडतो. त्यानंतर सोहळ्यासाठी आलेले वारकरी दिवसभर पालखी दर्शन, तुकारामांच्या पादुकांचे दर्शन त्याचबरोबर किर्तन भजनाचा आनंद घेतात.बीज सोहळा हा वारकऱ्यांचा अत्यंत मानाचा मानला जातो. वारकरी पंथाचे कळस तुकोबा आहेत असं एका अभंगात तुकोबांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी म्हटलंय. हे पाहता तुकोबांच्या बीजाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होतं.