शहरात सध्या 703 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 437 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
पुणे, 24 एप्रिल : जगभरातील देशांसाठी संकट ठरलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्यापासून रोखण्यात सुरुवातीच्या टप्प्यात भारताला यश आलं. मात्र भारतातील काही शहरांमध्ये आता या व्हायरसच्या संसर्गाने वेग पकडल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात गुरुवारी कोरोनाचे तब्बल 104 रुग्ण आढळून आले. पुण्यात एकाच दिवशी एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. 23 एप्रिल रात्री 10 वाजेपर्यंतच्या पुण्यातील 5 मोठ्या अपडेट्स - पुण्यात गुरुवारी चार कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. - डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण 667 रुग्णांवर उपचार. - कोरोनाचा संसर्ग झालेले 8 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. - 36 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 25 रुग्णांवर ससूनमध्ये तर उर्वरित रुग्णांवर खासगी हॉस्पिटलांमध्ये उपचार सुरू. - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 876. SRPFचे तीन जवान कोरोना पॉजिटिव्ह मुंबईत ड्यूटीवर तैनात असताना SRPFच्या तीन जवांना कोरोनाची लागण झाली आहे. हे 3 जवान पॉजिटिव्ह आढळून आल्याने 96 जवान क्वारनटाईन करण्यात आले आहेत. सोमवारीच मुंबईहून एसआरपीएफच्या पुणे हेडक्वॉटरला हे जवान आले होते. दरम्यान, दि. 22 व 23 एप्रिल रोजी पुणे शहरातील कोरोना अति संक्रमणशील क्षेत्रात लागू केलेले अतिरिक्त निर्बंध पुढील आदेशापर्यंत शिथिल करणेत आले असून तेथे पूर्वीप्रमाणे मनाई आदेश दुकाने उघडे ठेवणेच्या निर्धारित वेळेच्या बंधनांसह अंमलात राहतील. पुणे विभागात काय आहे स्थिती? विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 31 झाली असून विभागात 172 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 13 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. विभागात 1 हजार 31 बाधित रुग्ण असून 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 936 बाधित रुग्ण असून 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 21 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 37 बाधित रुग्ण असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 27 बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 10 बाधित रुग्ण आहेत. आजपर्यत विभागामध्ये एकुण 11 हजार 707 नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 11 हजार 46 चा अहवाल प्राप्त झाल असून 662 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 9 हजार 964 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 31 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 47 लाख 51 हजार 802 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 82 लाख 71 हजार 857 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 927 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे. संपादन - अक्षय शितोळे