सोलापूर, 16 डिसेंबर : गोवर या संसर्गजन्य आजारांच्या संशयित रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोलापूर शहरात 44 संशयित रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यांची चाचणी केली असता सुदैवाने एकाही रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही. परंतु लक्षणे ही गोवर प्रमाणेच आढळून आली आहेत. त्यामुळे गोवरचा धोका लक्षात घेता आजपासून पुढील 10 दिवस महापालिका आरोग्य केंद्राच्या वतीने गोवर विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा आरोग्य केंद्राच्या वतीने देखील बालरोग तज्ञ संघटना, सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, निम आणि खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी आपल्याकडे ताप आणि पुरळ या संदर्भातल्या सर्व रुग्णांची माहिती आरोग्य खात्यास देणे बंधनकारक करण्यात आले आहे. 9 महिने ते 5 वर्षापर्यंत बालकांसाठी आजपासून विशेष मोहीम संपूर्ण शहरात राबविण्यात येणार आहे. या लसीकरणांमध्ये प्रामुख्याने ऊसतोड कामगारांची बालके, स्थलांतरित कुटुंबीयातील बालके, विटभट्टी कामगारांची बालके, कोरोना नंतर कुपोषित झालेली बालके यांच्याकडे विशेष लक्ष अंगणवाडी सेविका देणार असल्याचे, महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी सांगितले.
Solapur : सिद्धेश्वर यात्रेचं काऊंटडाऊन सुरू, 1 कोटींचा रेडा ठरणार खास आकर्षण
काय आहेत गोवरची लक्षणे? गोवर याची प्राथमिक लक्षणे म्हणजे लहान मुलांना खोकला, जुलाब, निमोनिया, कान फुटणे, कुपोषण, पुरळ आणि मेंदूज्वर अशा प्रकारचे गुंतागुंतीचे आजार याची लक्षणे आढळतात. वारंवार येणारा ताप हे प्रमुख लक्षण नवजात शिशु मध्ये आढळते. हि लस कुठे घ्याल? जर बालकांमध्ये तापाचे प्रमाण अधिक आढळून आले तर आपण कोणत्याही खाजगी हॉस्पिटलमध्ये त्या संदर्भातील उपचार घेत असाल तर शहराच्या अंतर्गत असणाऱ्या नागरिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण करून घ्यावे. नई जिंदगी आरोग्य केंद्र, देगाव नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र , साबळे प्राथमिक आरोग्य केंद्र, दाराशा प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी लसीकरण उपलब्ध आहे.