सोलापूर, 24 सप्टेंबर : सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल(दि.24) रात्री उशिरा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान ते पळून गेल्याने त्यांना फरार घोषीत करण्यात आले आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक त्यांच्या अटकेसाठी मार्गावर असून ते फरार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेतल्या शिक्षिकेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अनेक वर्षांपासून अत्याचार केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार व खंडणीचा गुन्हा देखील दाखल झाला असल्याची माहिती मिळत आहे.
हे ही वाचा : राष्ट्रवादी खरंच सोडणार का? अमित शहांच्या भेटीबद्दल खडसेंचं स्पष्टीकरण
पीडित महिला ही विधवा असून ती सपाटे यांच्या शिक्षण संस्थेत शिक्षिका होती. सपाटे यांनी तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तिने विरोध केल्यानंतर तुला संस्थेतून काढून टाकीन, तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करीन, असे धमकावत तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केला. त्यांच्या त्रासाला कंटाळून एकवेळ विनयभंगाची तक्रार देण्यासाठी पीडित शिक्षिका गेली होती.
तेव्हाही तिच्यावर दबाव आणून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले. नंतर तिचा राजीनामा घेत निवृत्तीचे पैसे देण्यासाठी व जमिनीच्या व्यवहारातील, असे एकूण दहा लाख रुपये जबरदस्तीने वसूल केले, अशी तक्रार पीडित महिलेने दिली होती.
पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर तसेच फौजदार चावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, हे वृत्त शहरभर पसरल्याने मराठा समाजातील विविध संघटना एकवटल्या असून त्यांनी पोलीस आयुक्तांकडे सपाटे यांच्या अटकेची मागणी केली आहे.
हे ही वाचा : तोंडामध्ये मिरची कोंबली अन् कपडे फाडले, गुप्तांगावर ओतली दारू, पुण्यातील संतापजनक घटना
गुन्हा दाखल झाल्याने फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पथक सपाटे याच्या मार्गावर आहे. सपाटेंचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या घटनेतील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब, पंचनामे, खंडणी मागितल्याचे मोबाईल रेकॉर्डिंग, अत्याचार ग्रस्त ठिकाणाची पाहणी केली आहे. – वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील
सपाटेंच्या अटकेसाठी मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन
मनोहर सपाटे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिथे शिक्षणासारखे पवित्र कार्य चालते अशा पवित्र ठिकाणी मनोहर सपाटे यांच्यासारखे संस्था अध्यक्षपदाचा धाक दाखवून जर असे वागत असतील तर त्यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नाही. तसेच इतरांवरही अन्याय-अत्याचार झाल्याची विश्वसनीय माहिती मिळालेली आहे. त्यामुळे मराठा समाज सेवा मंडळ या संस्थेवर तातडीने प्रशासक नेमून शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी यांची चौकशी करून सपाटेवर गुन्हा दाखल करावा असे निवेदनात म्हटले आहे.